मारबत महोत्सवाच्या दोन कोटींच्या खर्चाचा हिशेब द्या

विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांची मनपाकडे मागणी

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
नागपूर
marbat-festival-expenditure नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मारबत महोत्सव-२०२६ साठी करण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खर्चाची संपूर्ण माहिती जाहीर करण्याची मागणी मनपाचे विरोधी पक्षनेते तथा प्रभाग क्रमांक ३०-ब चे नगरसेवक संजय मधुकरराव महाकाळकर यांनी केली आहे.

mahakalkar
महाकाळकर यांनी यासंदर्भात मनपाच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्तांना पत्र दिले आहे. मारबत महोत्सवासाठी स्थायी समितीमार्फत अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून महोत्सवाच्या आयोजनासाठी कोणकोणती कामे करण्यात आली, प्रत्येक कामासाठी किती खर्च झाला आणि हा खर्च कोणत्या पद्धतीने करण्यात आला, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
महोत्सवासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा तपशील, कामांचे स्वरूप, संबंधित खर्चाची प्रक्रिया आदी बाबींची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात तीन दिवसांच्या आत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाकाळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
दोन कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाबाबत पारदर्शकता राहावी आणि नागरिकांना या खर्चाची माहिती मिळावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आल्याचे महाकाळकर यांनी म्हटले आहे.