मक्का,
mecca shaken by saudi airstrikes सौदी अरेबिया आणि येमेनमधील हुथी बंडखोरांमधील संघर्ष पुन्हा तीव्र झाल्याचे समोर आले आहे. जॉर्डनच्या स्वतंत्र आणि खासगी ‘रोया न्यूज’ या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मक्कामध्ये धोक्याचा इशारा जारी करण्यात आला. हुथी गटाने दावा केला आहे की, सौदी अरेबियाने गेल्या २४ तासांत येमेनमधील लहज, तैझ, अल-जॉफ, मारिब आणि हज्जा या प्रांतांमध्ये तब्बल ५४ हवाई हल्ले केले.

‘अन्सार अल्लाह’ या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या हुथी संघटनेने सांगितले की, तैझ प्रांतातील खदीर जिल्ह्यातील एका सरकारी इमारतीला सौदीच्या हवाई हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. हुथींचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी या कारवाईसाठी खमिस मुशायत आणि ताईफ येथील सौदी हवाई तळांवरून उड्डाण केलेल्या एफ-१५ आणि टायफून लढाऊ विमानांचा वापर झाल्याचा दावा केला आहे. तसेच या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. दुसरीकडे, येमेनच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारच्या पंतप्रधानांनी हुथी बंडखोरांवर त्यांच्या लष्करी कारवायांदरम्यान नागरिकांची हत्या आणि विस्थापन केल्याचा आरोप केला आहे.
हुथी समर्थक माध्यमांच्या वृत्तानुसार, तैझ प्रांतातील धुबाब आणि मकबाना भागांमध्ये झालेल्या सौदीच्या हवाई हल्ल्यांत दोन मुलांसह तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून किमान दोन जण जखमी झाले आहेत. मात्र, सौदी अरेबियाने या आरोपांवर अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत विचारण्यात आलेल्या प्रतिक्रियेला उत्तर दिलेले नाही.
दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी गंभीर होताना दिसत आहे. यूके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका अज्ञात क्षेपणास्त्राने जहाजाला लक्ष्य केल्याची माहिती विलंबाने मिळाली. त्याचवेळी इस्रायली सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील कौनिन शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केल्याचे लेबनॉनच्या सरकारी नॅशनल न्यूज एजन्सीने म्हटले आहे. बिंत जबील जिल्ह्यातील कौनिनला या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. या सर्व घडामोडी आणि पाइपलाइन बंद पडल्याने सौदी अरेबियाकडून होणाऱ्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली असून, ब्रेंट क्रूडच्या किमती १०७ डॉलरच्या वर गेल्या आहेत.