नागपूर,
nagpur municipal corporation जन्माष्टमी, गौरी-गणपती आणि गणेशोत्सवाचा सण सुरू असतानाच प्रभाग क्रमांक ३६ मधील गांगुली लेआउट परिसरातील रस्ता ठेकेदारांनी चारही बाजूंनी खोदून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त यांनी रस्ते दुरुस्ती व कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले असतानाही गांगुली लेआउटमधील परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. पावसामुळे खोदलेल्या रस्त्यावर चिखल, खड्डे आणि पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या मार्गावर शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाही येत नसल्याने पालकांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी काही पालकांना मुलांना खांद्यावर किंवा पायी मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सणासुदीच्या काळात नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात वाढत असताना रस्त्याची ही अवस्था कायम राहणे धोकादायक ठरू शकते. हा रस्ता उन्हाळ्यातच दुरुस्त केला असता तर पावसाळ्यात नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली. महानगरपालिका प्रशासनाने ठेकेदाराला तातडीने सूचना देऊन खोदलेला रस्ता व्यवस्थित करून नागरिकांसाठी वाहतुकीस योग्य करावा, अशी मागणी गांगुली लेआउटमधील नागरिकांनी केली आहे.