जिल्हाधिकारी यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप खाते

परदेशी क्रमांकावरून नागरिकांना संदेश

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
नाशिक
collector ayush prasad जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावासह त्यांच्या पदाचा आणि अधिकृत छायाचित्राचा गैरवापर करून बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट तयार करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या बनावट खात्यावरून थायलंडसह परदेशी क्रमांकाचा वापर करून नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
 

Nashik collector ayush prasad fake whatsapp account alert 
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी आयुष प्रसाद यांचे नाव, जिल्हाधिकारी हे पद आणि त्यांचे अधिकृत छायाचित्र वापरून व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट तयार केले आहे. या खात्यावरून परदेशी क्रमांकावरून नागरिकांना संदेश पाठवले जात आहेत. संबंधित संदेशांमध्ये “Hello… How are you doing… Where are you at the moment?” अशा स्वरूपाची सर्वसाधारण आणि अनौपचारिक विचारणा केली जात आहे. त्यामुळे हा संपर्क प्रत्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असल्याचा गैरसमज नागरिकांमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी स्पष्ट केले आहे की, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वतीने अशा प्रकारे कोणत्याही परदेशी क्रमांकावरून नागरिकांशी संपर्क साधला जात नाही. शासकीय किंवा अधिकृत कामकाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केवळ अधिकृत माध्यमांचा वापर करूनच संपर्क साधला जातो. त्यामुळे अनोळखी किंवा परदेशी क्रमांकावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने संदेश अथवा कॉल आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बनावट खात्याच्या माध्यमातून पुढे collector ayush prasad आर्थिक फसवणूक किंवा अन्य गैरप्रकार करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी संबंधित परदेशी क्रमांकावरून येणाऱ्या कोणत्याही संदेशाला किंवा कॉलला प्रतिसाद देऊ नये, तसेच व्हॉट्सॲपवरून आलेल्या अशा संदेशांना उत्तर देणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शक्य असल्यास संबंधित क्रमांक तातडीने ब्लॉक करण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.दरम्यान, संशयास्पद माहिती किंवा संपर्क आढळल्यास नागरिकांनी विलंब न करता जिल्हाधिकारी कार्यालय अथवा स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बनावट व्हॉट्सॲप खाते बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता अधिकाऱ्यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे प्रकार घडू शकतात, याचे हे प्रकरण उदाहरण ठरले आहे. त्यामुळे अधिकृत माहिती मिळविताना नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळासह प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना आणि माध्यमांचाच आधार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.