अनिल कांबळे
नागपूर,
police personnel are police शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सण-उत्सवाच्या काळात अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या नागपूर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरच सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. दर महिन्याला एक तारखेला खात्यात जमा होणारा पगार १५ तारीख उलटूनही मिळालेला नसल्याने पोलिस कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात पगार रखडल्याने अनेक कर्मचाऱ्यांना घरखर्च, मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते आणि सणांचा खर्च भागविण्यासाठी आर्थिक तडजोड करावी लागत आहे.
गणेशोत्सव आणि हरतालिकेनंतर आता नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. सण म्हटला की घरातील मुलांसाठी कपडे, पूजेचे साहित्य, नैवेद्य, घरातील आवश्यक वस्तू तसेच पाहुणचारासाठी खर्च करावा लागतो. मात्र, पगारच खात्यात जमा झालेला नसल्याने अनेक पोलिस कुटुंबांमध्ये यंदाचा सण नेमका कसा साजरा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही कर्मचाऱ्यांना सणाचा खर्च भागविण्यासाठी मित्र, नातेवाईक किंवा परिचितांकडून उधारी घ्यावी लागत असल्याची स्थिती आहे.
सण-उत्सवांच्या काळात पोलिस दलावर कामाचा अतिरिक्त ताण असतो. गणेशोत्सव, हरतालिका आणि, दसरा, नवरात्रोत्सवाच्या काळात बंदोबस्त, मिरवणुका, वाहतूक नियमन आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर तैनात असतात.police personnel are police नागरिकांचा सण आनंदात पार पडावा यासाठी पोलिस आपले कौटुंबिक कार्यक्रम बाजूला ठेवून ड्युटी बजावत असतात. मात्र, त्याच काळात स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी त्यांना पगाराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पगार लवकरात लवकर जमा व्हावा, अशी अपेक्षा पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सणासुदीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस दादांना आता त्यांच्या हक्काच्या पगाराची प्रतीक्षा लागली आहे.