नवी दिल्ली,
rain warning for 20 states मान्सूनचा जोर हळूहळू कमी होत असला तरी देशातील अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) १५ सप्टेंबरसाठी देशातील २० राज्यांना पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ६० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीत पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज असून हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडू शकतात. आज येथे कमाल तापमान ३२ अंश आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद, आग्रा, मथुरा, मुझफ्फरनगर, मोरादाबाद, कानपूर, गौतम बुद्ध नगर, सीतापूर, सहारनपूर, गोंडा, बिजनौर, रामपूर आणि उन्नावसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. लखनौमध्ये कमाल ३३ आणि किमान २६ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे.
मध्य प्रदेशातील सागर, नरसिंहपूर, मंडला, नर्मदापुरम, इंदूर आणि भोपाळसह विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी ५५ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. राजस्थानमध्ये टोंक, करौली, पाली, दौसा, भरतपूर, कोटा, धोलपूर आणि उदयपूर या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जयपूरमध्ये कमाल ३० आणि किमान २५ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे.
बिहारमधील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला असून वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहू शकतो. गुजरातमध्ये अहमदाबाद, गांधीनगर, राजकोट, मोरबी, पोरबंदर, जामनगर आणि देवभूमी द्वारकासह आठ जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे सुरू असताना नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.