नवी दिल्ली
team india भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला आशिया कप 2026च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा तब्बल 72 धावांनी पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने आठव्यांदा महिला आशिया कपच्या विजेतेपदावर नाव कोरलं. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत भारतीय संघाने हा किताब पटकावला. या शानदार विजयानंतर भारतीय महिला संघावर बक्षिसांच्या रूपाने पैशांचा वर्षाव होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून यंदाच्या स्पर्धेसाठी नव्या बक्षीस रकमेची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली, तरी मागील हंगामात निश्चित केलेल्या बक्षीस रचनेनुसार रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
विजेत्या भारताला किती रक्कम मिळणार?
आठव्यांदा आशिया कप जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला 25 हजार अमेरिकी डॉलर, म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 21 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळण्याची शक्यता आहे. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या श्रीलंकेच्या संघाला उपविजेतेपदासाठी 15 हजार अमेरिकी डॉलर, म्हणजेच अंदाजे 12.5 लाख रुपये मिळू शकतात.
हरमनप्रीत कौरने रचला इतिहास
दरम्यान, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने या विजेतेपदासह आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कर्णधार म्हणून हे तिचं चौथं आशिया कप विजेतेपद ठरलं. या कामगिरीसह हरमनप्रीतने भारताची माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजचा विक्रम मागे टाकला. मितालीच्या नेतृत्वाखाली भारताने तीन वेळा आशिया कप जिंकला होता. आता चार विजेतेपदांसह हरमनप्रीत कौरने कर्णधार म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
भारताचा आशिया कपवर दबदबा
भारताने यापूर्वी 2004, 2005, 2006, 2008, 2012, 2016 आणि 2022 मध्ये महिला आशिया कपचं विजेतेपद पटकावलं होतं. 2018 मध्ये बांगलादेशने भारताचं वर्चस्व मोडलं, तर 2024 मध्ये श्रीलंकेने विजेतेपदावर कब्जा केला. मात्र 2026 मध्ये भारताने पुन्हा एकदा दिमाखात ट्रॉफी उंचावत आशिया कपच्या इतिहासातील आपलं आठवं विजेतेपद साजरं केलं.