अनिल कांबळे
नागपूर,
videos of sexual relations viral वर्धा येथील ३९ वर्षीय महिलेवर एका तरुणाने नागपुरातील जनता चौकातील एका नामांकित हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केला. तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ मोबाईलने काढले. ते अश्लील व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी वर्धा येथून प्राप्त तक्रारीच्या आधारे सोनेगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका शासकीय विभागात नोकरी करते. २०२३ मध्ये तिची ओळख वर्धा जिल्ह्यातील पिपरी मेघे येथील बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर राहणाऱ्या उमेशसिंह सूर्यवंशी (४०) याच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यानंतर आरोपीने महिलेला काही कारण सांगून नागपुरात आणले. तिला फ्रेश होण्यासाठी जनता चौकातील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले.
व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेलिंग
अत्याचारादरम्यान आरोपीने महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर या व्हिडिओचा गैरवापर करून आरोपी महिलेवर दबाव टाकत होता. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेकडे एक लाख रुपयांची मागणी केली.आरोपीकडून सातत्याने धमक्या आणि ब्लॅकमेलिंग सुरू राहिल्याने त्रस्त झालेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. घटनास्थळ नागपुरातील सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने प्रकरणाची चौकशी सोनेगाव पोलिसांकडे सोपविण्यात आली. पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला असून, आरोपी उमेशसिंह सूर्यवंशी अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.