वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

नवतळा येथील येवा जंगलातील घटना

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
चिमूर
tiger attack तालुक्यातील नेरीजवळील नवतळा येथे गुरे चारायला गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला केल्याची घटना मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, तो थोडक्यात बचावला.
 
tiger
नवतळा येथील तरुण शेतकरी शुभम वसंता शिवरकर हे घरची गुरे घेऊन गावाजवळील येवा जंगलात गेले होते. दुपारी 4 वाजताच्या सुमारास अचानक गुरे पळू लागली आणि ओरडू लागली. काय झाले हे पाहण्यासाठी शुभम त्या दिशेने गेला असता, दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात शुभमच्या हातावर आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. मात्र, त्याने प्रसंगावधान राखत हातातील काठीने प्रतिकार केला आणि जोरजोरात आरडाओरड केल्याने वाघाने त्याला सोडले आणि जंगलात पळ काढला. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला.
 
घटनेची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. शेतकरी शुभमला चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णाच्या उपचारासाठी वनविभागाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपा महामंत्री महादेव कोकोडे यांनी केली आहे. या घटनेची माहिती आमदार बंटी भांगडिया यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ वनविभागाला आदेश देत जखमीवर उपचार करण्याच्या आणि वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना वनाधिकार्‍यांना दिल्या.