वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

जांभळी वनपरिक्षेत्रातील घटना

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
गोंदिया
tiger attack शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी जंगल शिवारात गेलेल्या वृद्ध शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना एफडीसीएमच्या जांभळी-१ वनपरिक्षेत्रात मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. वातू बकाराम राऊत (७२) रा. झुरकूटोला ता. सडक अर्जुनी असे त्या मृत वृद्ध शेतकर्‍याचे नाव आहे.
 

gondia tiger 
मिळालेल्या माहितीनुसार वातू राऊत हे सकाळी शेळ्यांसाठी झाडाच्या फांद्या (चारा) आणण्यासाठी जंगलात गेले होते. दरम्यान, वनपरिक्षेत्र जांभळी-१ येथील पळसगाव बीट राखीव वनक्षेत्र कक्ष क्रमांक ५२४ येथे दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती त्यांच्यासोबत असलेल्या इतर शेतकर्‍यांनी गावात दिली. त्यानंतर पाटेकुर्रा येथील सरपंच प्रशांत बालसनवार यांनी वन विभाग व पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभाग व पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास एफडीसीएम जांभळीचे वनपरिक्षेत्राधिकारी मुलचंद नंदेश्वर, सडक अर्जुनीचे वनपरिक्षत्राधिकारी मिथुन तरोणे, ठाणेदार कमलेश सोनटक्के तसेच संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगल परिसरात वाघाचा वावर असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.