चालान कारवाईतही वाहतूक पोलिस अव्वल

- सोनेगाव, सदर परिमंडळांचा वचक; ७९ लाखांहून अधिक दंड वसूल

    दिनांक :15-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
traffic police lead शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि वाहतूक पोलिसांचा वचक राहावा, यासाठी पोलिस आयुक्तांनी धडक कारवाई सुरू केली आहे. वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी केलेल्या दंडाची रक्कम वसुली करण्यावर वाहतूक पोलिसांनी भर दिला आहे. पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकरणांचा जलद निपटारा करीत १३०० प्रकरणांमध्ये तब्बल ७९ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला. शहरातील मुख्य चौकांत जवळपास ३ हजार ४०० वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
 
 
 
traffic police lead
 
 
त्या माध्यमातून शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे सोपे जात आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चालानच्या माध्यमातून कारवाईसुद्धा केली जाते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पॉस मशीनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. मात्र, अनेक वाहनचालकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून केलेल्या ई-चालानची माहिती नसते. त्यामुळे अनेकांवर ई-चालन प्रलंबित असतात. लोकअदालतीच्या माध्यमातून वाहतूक पोलिस दंड भरण्याची संधी आणि सुविधा उपलब्ध करून देतात. अशा वाहनचालकांना काही प्रमाणात सवलतही देण्यात येते. विविध वाहतूक विभागांतील एकूण १,३०० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून, तब्बल ७९ लाख ५ हजार ६५० रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस लक्ष ठेवत असून, दणक्यात दंड वसुलीही केली आहे.
कारवायांमध्ये सोनेगाव क्रमांक एकवर ४६९ ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणांमधून ६७ लाख ७६ हजार २५० रुपये, न्यायालयात पाठविण्यात आलेल्या ६६२ ई-चालानच्या प्रकरणांमधून ९ लाख ९३ हजार ९५० रुपये, तसेच इतर १६९ प्रकरणांमधून १ लाख ३५ हजार ४५० रुपये इतकी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली. विभागनिहाय कामगिरीत सोनेगाव वाहतूक परिमंडळाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत पांडे यांच्या पथकाने सर्वाधिक १५ लाख ५ हजार २०० रुपये दंड वसूल केला.traffic police lead तसेच सोनेगाव वाहतूक पोलिसांनी सर्वाधिक १०१ डीडी कारवाई करीत आघाडी मिळविली. दुसऱ्या स्थानावर सदर वाहतूक विभाग असून, पोलिस अधिकारी सुनील जाधव यांच्या नेतृत्वात १२ लाख ७३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास सीसीटीव्ही आणि वाहतूक पोलिसांकडून चालान कारवाई करण्यात येते. वाहतूक चालान भरणे अनिवार्य आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.
- आदित्य मिरखेलकर