गोंदिया,
drain cleaning गावातील नालेसफाईचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने संतप्त झालेल्या तरुणाने चक्क ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन सुरू केले आहे. गोरेगाव तालुक्यातील कमरगाव येथे मंगळवारी (दि. १५) हा प्रकार घडला. दिनेश नागपूरे असे आंदोलनकर्त्या तरुणाचे नाव असून, मागणी पूर्ण न झाल्यास धानावर फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा त्याने दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
कमरगावातील नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचून अस्वच्छता निर्माण झाली आहे. घरांसमोर साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप नागपूरे यांनी केला आहे. दरम्यान, नालेसफाई करण्यात यावी, यासाठी त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली असून पंचायत समिती गोरेगाव, जिल्हाधिकारी गोंदिया यांनाही निवेदनातून गावात स्वच्छता करण्याची मागणी केली आहे. मात्र, याची दखलच घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. अखेर संतप्त होत त्यांनी ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन सुरू केले. आंदोलनावेळी नागपूरे यांच्याकडे धान पिकावर फवारणीसाठी वापरण्यात येणारे औषध असल्याचे समोर आले. नालेसफाईची मागणी तातडीने मान्य न झाल्यास औषध प्राशन करून जीव देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित प्रशासन व नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली.drain cleaning घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून नागपूरे यांची समजूत काढून त्यांना खाली उतरविण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाकडून नालेसफाईबाबत कोणती कार्यवाही केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मुख्यालयाला खो....
महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ग्रामपंचायत अधिकारी यांनी नियुक्त ग्रामपंचायतीच्या मुख्यालयी राहणे अपेक्षित आहे. ग्रामस्थांना शासकीय योजनांची माहिती, विविध दाखले तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित कामांसाठी सचिवांची आवश्यकता असते. मात्र, कमरगाव ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी मुख्यालयी नियमित हजर राहत नसल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांकडून होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.