खार्तूम,
60 killed in gold mine collapse सुदानमधील वेस्ट कॉर्डोफान भागात सोन्याची खाण कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. अल-नुहुद शहराच्या उत्तरेकडील परिसरात रविवारी झालेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, १६ सप्टेंबर रोजी तीन स्थानिक सूत्रांनी या दुर्घटनेची माहिती दिली.
सुदान हा आफ्रिकेतील प्रमुख सोने उत्पादक देशांपैकी एक आहे. मात्र, देशातील बहुतांश सोने पारंपरिक आणि धोकादायक पद्धतीने काढले जाते. या कामासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि बचावाची साधने उपलब्ध नसल्याने दुर्घटनांचा धोका वाढतो. खाणीत दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य करताना अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असते. सुदानमधील सोन्याचा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पद्धतीने व्यापार आणि तस्करीही होत असल्याचे वृत्त आहे.
वेस्ट कॉर्डोफानमधील अनेक सोन्याच्या खाणी अर्धसैनिक दल ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेज’च्या नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले जाते. या खाणी त्यांच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन मानल्या जातात. मात्र, खाणीत काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी पुरेशी पावले उचलली जात नसल्याचे वृत्त आहे. यापूर्वीही सुदानमध्ये अशाच दुर्घटना घडल्या आहेत. जुलै २०२६ मध्ये उत्तर सुदानमधील वादी हाफा येथील सोन्याच्या खाणीत झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला होता. त्याआधी एप्रिल २०२६ मध्ये खाण दुर्घटनेत ७ मजुरांचा मृत्यू, तर ६ जण जखमी झाले होते.