you visited these 4 places in nepal परदेश प्रवासाचा आनंद घेताना कमी खर्चात निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्माचा अनुभव घ्यायचा असेल, तर भारताचा शेजारी देश नेपाळ हा पर्यटकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या नेपाळमध्ये प्राचीन मंदिरे, शांत वातावरण आणि मनमोहक नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळते. आयुष्यात एकदा तरी या देशातील काही खास ठिकाणांना भेट देण्याचा अनुभव नक्कीच संस्मरणीय ठरू शकतो.
पोखरा हे नेपाळमधील प्रमुख पर्यटनस्थळ असून तेथील फेवा सरोवर पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. सरोवरात नौकाविहार करताना अन्नपूर्णा पर्वतरांगेचे प्रतिबिंब पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो. सारंगकोट येथून दिसणारा सूर्योदयही प्रसिद्ध आहे. याशिवाय डेव्हिस फॉल्स आणि वर्ल्ड पीस पॅगोडा पाहता येतात. साहसी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी पॅराग्लायडिंग, झिप-लाइनिंग आणि बंजी जंपिंगचे पर्यायही उपलब्ध आहेत.
नेपाळची राजधानी काठमांडू येथे इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. ऐतिहासिक दरबार स्क्वेअरसह युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमुळे हे शहर पर्यटकांसाठी विशेष महत्त्वाचे आहे. पशुपतिनाथ मंदिर, बौद्धनाथ स्तूप आणि स्वयंभूनाथ ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. स्थानिक बाजारपेठांमध्ये पारंपरिक नेपाळी हस्तकला आणि हातमागाच्या वस्तूंची खरेदीही करता येते.
निसर्ग आणि वन्यजीवांचा अनुभव घ्यायचा असल्यास चितवन राष्ट्रीय उद्यान हा एक वेगळा पर्याय आहे. नेपाळचे हे पहिले राष्ट्रीय उद्यान असून ते गेंडे आणि बंगाल वाघांसाठी ओळखले जाते. येथे जंगल सफारी, हत्ती सफारी तसेच राप्ती नदीतील नौकाविहाराचा आनंद घेता येतो. दुसरीकडे, भगवान बुद्धांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे लुंबिनी हे जगभरातील बौद्ध धर्मीयांसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. माया देवी मंदिर, पवित्र पुष्करिणी तलाव आणि विविध देशांनी उभारलेले बौद्ध मठ येथे पाहायला मिळतात. शांत आणि निवांत वातावरणामुळे लुंबिनीचा प्रवासही विशेष ठरतो.बी ;