दोन दिव्यांग मुलींच्या विवाहासाठी मंगळसूत्रदान

डॉ. प्रीती रोकडे यांनी घेतला पुढाकार

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
अचलपूर, 
amravati social workerवाढदिवस म्हटला की केक, फुले, शुभेच्छा आणि जल्लोष…मात्र नागपूर येथील डॉ. प्रीती रोकडे यांनी आपल्या वाढदिवसाला या रूढ चौकटीला छेद देत माणुसकीचा अनोखा आदर्श घालून दिला. स्वतःसाठी उत्सव साजरा करण्याऐवजी त्यांनी वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर दिव्यांग बालगृहातील दोन बेवारस दिव्यांग मुलींच्या आगामी विवाहासाठी चक्क दोन मंगळसूत्रे दान केली. त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाने बालगृहातील वातावरण भावूक झाले.
 
तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, मूकबधिर दिव्यांग बालगृह १९९० पासून बेवारस दिव्यांग मुला-मुलींच्या संगोपनासह त्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. या बालगृहातील अनेक दिव्यांग मुला-मुलींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. नागपूर येथील डाॅ.
 
mangal
 
प्रीती रोकडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग मुलांसोबत आनंद साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी बालगृहाच्या अधीक्षिका प्रमिला नघाटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून वाढदिवस बालगृहात साजरा करण्याची तसेच दिव्यांग मुलांना भेटवस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, बालगृहात कुणाचाही वाढदिवस साजरा केला जात नसल्याचे अधीक्षिका नघाटे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी दिवाळीनंतर बालगृहातील दोन मूकबधिर दिव्यांग मुलींचे विवाह होणार असल्याचे सांगून, त्यांना विवाहासाठी काही मदत करता आली तर ती अधिक मोलाची ठरेल, असे त्यांनी सुचविले.
 
हे ऐकताच डॉ. प्रीती यांनी क्षणाचाही विलंब न करता विवाहासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. आपल्या पती प्रवीण रोकडे, आई उषा कवाने, वडील रामकृष्ण कवाने तसेच मुलगा आर्यन रोकडे आणि श्रीजीत रोकडे यांना सोबत घेऊन त्या सकाळी अकरा वाजता बालगृहात पोहोचल्या. यावेळी बालगृहातील ममता आणि पद्मा, या दोन्ही मूकबधिर दिव्यांग मुलींच्या आगामी विवाहासाठी त्यांनी त्यांच्या हाती प्रत्येकी एक मंगळसूत्र ठेवले. मंगळसूत्र देताना दोन्ही मुलींना भरभरून आशीर्वाद देत त्या म्हणाल्या, मला मुली नाहीत; पण आजपासून या दोघी माझ्या मुली आहेत.
 
संस्थेचे संस्थापक शंकरबाबा पापळकर यांच्या दातृत्वाचे त्यांनी कौतुक केले. दान अनेक प्रकारचे असते; परंतु एखाद्या बेवारस दिव्यांग मुलीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या क्षणी तिच्या संसाराच्या स्वप्नाला हातभार लावणे, हे दान खऱ्या अर्थाने अमूल्य आहे, अशी भावना शंकरबाबा यांनी व्यक्त केली. आजपर्यंत जनतेच्या सहकार्यामुळे बालगृहातील सुमारे ३० बेवारस दिव्यांग मुलींचे विवाह पार पडले आहेत.