नवी दिल्ली,
Cigarettes have become more expensive सिगारेटच्या वाढत्या किमतीमुळे धूम्रपान करणाऱ्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. आयटीसीने आपल्या काही निवडक सिगारेट ब्रँडच्या कमाल किरकोळ किमतीत वाढ केली असून नव्या किमती असलेली पाकिटे बाजारात पोहोचू लागली आहेत. त्यामुळे क्लासिक कनेक्ट आणि गोल्ड फ्लेक सुपर स्टारच्या ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.आयटीसीच्या क्लासिक कनेक्टच्या २० सिगारेटच्या पाकिटाची किंमत ३९० रुपयांवरून थेट ४२८ रुपये झाली आहे. म्हणजेच या पाकिटाच्या किमतीत सुमारे ९.७४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे गोल्ड फ्लेक सुपर स्टारच्या १० सिगारेटच्या पाकिटासाठी आता ८९ रुपये मोजावे लागतील. यापूर्वी हे पाकीट ७९ रुपयांना मिळत होते. त्यामुळे या उत्पादनाच्या किमतीत सुमारे १२.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०२६ मध्ये या दोन्ही ब्रँडच्या किमतीत यापूर्वीही अनेकदा बदल झाले आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, फेब्रुवारीमध्ये क्लासिक कनेक्टची किंमत ३०० रुपयांवरून ३६० रुपये आणि त्यानंतर ३९० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. गोल्ड फ्लेक सुपर स्टारची किंमतही आधी ५९ रुपयांवरून ७० रुपये आणि नंतर ७९ रुपयांपर्यंत पोहोचली होती. १ फेब्रुवारी २०२६ पासून सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांवर ४० टक्के वस्तू व सेवा करासह अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू केले जाणार असल्याने कंपन्यांच्या वाढलेल्या करभाराचा परिणाम किमतींवर झाल्याचे सांगितले जात आहे. नव्या कमाल किरकोळ किमतीची पाकिटे काही ठिकाणी उपलब्ध होऊ लागली असून, ज्या ठिकाणी अद्याप जुनी पाकिटे आहेत, तेथील साठा संपल्यानंतर नव्या किमतीची पाकिटे मिळण्याची शक्यता आहे.