तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य ३ कोटी ५९ लाख
वर्धा,
Decision of the Lok Adalat राष्ट्रीय विधि सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा न्यायिक जिल्ह्यामध्ये १२ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये कौटूंबिक हिंसाचाराचे ५ प्रकरणासह १ हजार ६६९ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली असून तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रकमेचे मुल्य ३ कोटी ५९ लाख ९५ हजार ३०५ इतके आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपापली बाजू मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशांची बचत होते. मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी याप्रसंगी व्यत केले.
जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव संजीव सरदार यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यामागील भूमिका मांडत वादापेक्षा समझोता बरा, यानुसार पक्षकारांनी आपसातील वाद समोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे, असे आवाहन केले.
विशेष लोक अदालतीमध्ये जिल्हा अधिवता संघाचे अध्यक्ष, जिल्हातील अधिवता आणि पक्षकारांनी सहभाग नोंदविला.
यावेळी न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी १ हजार ३७३ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रकमेचे मुल्य १ कोटी ६१ लाख १७ हजार ५५६ इतके होते. तसेच वाद दाखल पूर्व प्रकरणांपैकी २९६ इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. वाद दाखल पूर्व प्रकरणांमधील तडजोडीचे मूल्य १ कोटी ९८ लाख ७७ हजार ७४९ इतके आहे.
या लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या कौटूंबिक हिंसाचाराच्या ५ प्रकरणामध्ये पती-पत्नीमध्ये असलेले वाद या लोक अदालतीद्वारे निपटारा करण्यात आले असल्याचे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणच्या वतीने देण्यात आली.