मक्केच्या हवाई हद्दीत घुसण्याआधीच ड्रोन पाडला!

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
मदिना,
Drone shot in Mecca's airspace मक्केच्या दक्षिणेकडे येमेनमधील हुथी बंडखोरांनी सोडल्याचा दावा करण्यात आलेला ड्रोन सौदी अरेबियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केला. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने बुधवारी या घटनेनंतर इस्लाममधील दोन पवित्र स्थळे आणि तेथे येणाऱ्या यात्रेकरूंची सुरक्षा ही ‘रेड लाईन’ असल्याचे स्पष्ट केले. आघाडीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 15 सप्टेंबरच्या संध्याकाळी मक्केच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी ड्रोन रोखण्यात आला. सौदी आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी या घटनेला शत्रुत्वपूर्ण आणि दहशतवादी कृत्य संबोधले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा मक्केला लक्ष्य करण्याचा हुथींचा दुसरा प्रयत्न आहे.

Drone shot in Mecca
 
यापूर्वी 27 जुलै 2017 रोजी मक्केच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचा सौदी आघाडीचा दावा आहे. अल-मलिकी यांनी यात्रेकरू, नागरिक आणि रहिवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत, हुथींकडून होणाऱ्या हल्ल्यांना रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा इशारा दिला. दरम्यान, हुथी प्रवक्ते हजेम अल-असद यांनी मक्केला लक्ष्य केल्याचा सौदीचा आरोप फेटाळून लावला आहे. हुथींकडून सौदीच्या विविध भागांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हुथी लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी गेल्या 24 तासांत सौदीच्या लढाऊ विमानांनी येमेनमधील पाच प्रांतांमध्ये 52 हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, खमिस मुशायत आणि ताईफ येथील हवाई तळांवरून एफ-15 आणि टायफून लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला.
 
तैझ, अल-जॉफ, अल-बायदा, सादा आणि अमरान या भागांमध्ये हल्ले झाल्याचा हुथींचा दावा असून, या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम येमेन आणि सौदी अरेबियातील तणावावरही होत आहे. येमेनच्या लाल समुद्र किनाऱ्यावरील भागावर हुथींचे नियंत्रण वाढल्याने बाब-अल-मंदेब या महत्त्वाच्या सागरी मार्गाच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या मार्गावरून व्यापारी जहाजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. मक्केजवळील ड्रोन घटनेनंतर सौदी आघाडीने दिलेला ‘रेड लाईन’चा इशारा या संघर्षाच्या पुढील घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.