तिवसा,
farmer strikeअल्प पाऊस, पिकांचे नुकसान, सिंचनाचा अभाव, शेतीच्या वीजपुरवठ्यातील अडचणी, पीकविम्याचे जाचक निकष आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चक्क १३ किलोमीटर पायी प्रवास करून तिवसा तहसील कार्यालयाला धडक दिली. शिवणगाव-फत्तेपूर परिसरातून सुरू झालेल्या या पदयात्रेत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. पायी चालणाऱ्या शेतकऱ्यांसोबत ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांचा ताफाही असल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख आणि प्रहारचे जिल्हाप्रमुख योगेश लोखंडे यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात आली. फत्तेपूर येथून सुरू झालेल्या पदयात्रेत शिवणगाव, फत्तेपूर, वऱ्हा, कुन्हा, गुरुकुंज मोझरी, तळेगाव ठाकूर यासह तालुक्यातील विविध गावांमधील शेतकरी सहभागी झाले. हातात मागण्यांचे फलक घेऊन शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष आपल्या प्रश्नांकडे वेधले. तिवसा तालुक्यासह अमरावती जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती चिंताजनक असून अनेक भागांत पिकांना अपेक्षित पाणी मिळाले नाही. त्यामुळे तिवसा तालुक्यासह अमरावती जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकरी व शेतमजुरांना तातडीने आर्थिक मदत देऊन संकटातून सावरण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिवणगाव-फत्तेपूर परिसरातील बहुतांश शेती सिंचनाच्या सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेचे पाणी फत्तेपूर-शिवणगाव परिसरातील कोरडवाहू शेतजमिनीपर्यंत पोहोचवावे, अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
वीजपुरवठा सुरळीत नसल्याने सिंचनावर परिणाम होत असून त्याचा थेट फटका पिकांना बसत असल्याचे शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. पीकविम्याचे जाचक निकष रद्द करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात प्रहारचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख, जिल्हाप्रमुख योगेश लोखंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी सहभागी झाले होते.