गडचिरोली,
Dr. Varsha Lahade suspended जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्याविरोधात अक्षम्य निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निलंबनाची कारवाई केली आहे. यासोबतच त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 च्या पोटनियम (1) (अ) अन्वये डॉ. लहाडे यांना आदेशाच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत हे निलंबन कायम राहणार आहे. निलंबनाच्या कालावधीत डॉ. लहाडे यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे. सक्षम अधिकार्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
निलंबनाच्या कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 16 नुसार त्यांना खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा स्वतःचा व्यापार अथवा उद्योग करता येणार नाही. निलंबनाच्या कालावधीत त्यांनी अशी कोणतीही नोकरी अथवा व्यवसाय केल्याचे आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद आहे.
दरम्यान, निलंबनाच्या कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधीत, स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, 1981 मधील तरतुदीनुसार डॉ. लहाडे यांना निर्वाहभत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल महादेव कुमेरिये यांच्या डिजिटल स्वाक्षरीने 16 सप्टेंबर 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. आदेशात विभागीय चौकशीचे निर्देश देण्यात आल्याने या प्रकरणातील पुढील कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे.