नवी दिल्ली,
gold chemical paste in undergarments अंडरगारमेंटमध्ये लपवलेल्या तीन कॅप्सूलमधून सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उघडकीस आला. विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या प्रतिबंधक पथकाने आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) केलेल्या कारवाईत एका बांगलादेशी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई 12 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आली.
संबंधित प्रवासी जेद्दाहून एअर इंडियाच्या AI256 क्रमांकाच्या विमानाने दिल्ली विमानतळावरील टर्मिनल-3 येथे पोहोचला होता. त्यानंतर त्याच दिवशी एअर इंडियाच्या AI237 क्रमांकाच्या विमानाने त्याला बांगलादेशातील ढाका येथे जायचे होते. आंतरराष्ट्रीय संक्रमण क्षेत्रात तपासणीदरम्यान सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी त्याला रोखले. सखोल तपासणी केली असता अंडरगारमेंटमध्ये भूरे-पांढऱ्या रंगाचे तीन अंडाकृती कॅप्सूल आढळून आले. त्यामध्ये रासायनिक पेस्टच्या स्वरूपात सोने असल्याचा संशय होता. पॅकिंगसह या पदार्थाचे एकूण वजन सुमारे 1,596 ग्रॅम होते.
यानंतर बांगलादेशी प्रवाशाला विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय आगमन कक्षातील सीमा शुल्क प्रतिबंधक कार्यालयात नेण्यात आले. रासायनिक प्रक्रियेद्वारे पेस्टमधून सोने वेगळे केल्यानंतर 1,346 ग्रॅम वजनाच्या दोन आयताकृती सोन्याच्या पट्ट्या जप्त करण्यात आल्या. जप्त सोन्याची एकूण शुल्कमूल्य किंमत 1 कोटी 88 लाख 20 हजार 715 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. चौकशीदरम्यान प्रवाशाने जेद्दाहून दिल्लीपर्यंत रासायनिक पेस्टच्या स्वरूपात सोने आणल्याची कबुली दिली. दिल्ली विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय संक्रमण क्षेत्रातून हे सोने पुढे नेण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचेही चौकशीत समोर आले. सीमा शुल्क विभागाने सीमा शुल्क कायदा, 1962 मधील कलम 110 अंतर्गत 1,346 ग्रॅम सोने जप्त केले असून, कलम 104 अंतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.