अरबी समुद्रात भारत-पाक युद्धनौकांची टक्कर!

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
india pakistan warships clash उत्तर अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौकेला पाकिस्तानी नौदलाच्या पीएनएस हुनैन या जहाजाची धडक बसल्याची घटना १५ सप्टेंबरच्या संध्याकाळी घडली. भारतीय बाजूच्या माहितीनुसार, भारतीय युद्धनौका नियमित देखरेख मोहिमेवर असताना पाकिस्तानी जहाज वेगाने जवळ आले आणि त्याच्या हालचाली असुरक्षित असल्याने ही टक्कर झाली. या घटनेत भारतीय नौदलाच्या जहाजाचे मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले, तर पीएनएस हुनैनचे नुकसान झाल्यानंतर ते कराचीच्या दिशेने परतले.
 
india pakistan warships clash
 
पीएनएस हुनैन हे पाकिस्तान नौदलातील यारमूक श्रेणीतील सागरी गस्ती जहाज आहे. हे जहाज सध्या सुरू असलेल्या ‘सी स्पार्क-२०२६’ या नौदल सरावाचा भाग असल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या प्रभारी राजदूतांना पाचारण करून तीव्र निषेध नोंदवला. भारताने पाकिस्तानी नौदलाच्या हालचालींना ‘अस्वीकार्य आणि अव्यावसायिक’ ठरवत, १९९१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान कराराच्या कलम १०चा संदर्भ दिला आहे.
 
या करारातील महत्त्वाची तरतूद म्हणजे आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात दोन्ही देशांच्या नौदलाची जहाजे आणि पाणबुड्या एकमेकांच्या तीन नॉटिकल मैलांपेक्षा जवळ येऊ नयेत. तीन नॉटिकल मैल म्हणजे सुमारे ५.५६ किलोमीटर अंतर. अपघात आणि धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी हे अंतर राखण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील ताज्या घटनेनंतर या नियमाचे पालन झाले का, हा मुद्दा चर्चेत आला आहे.
 
समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित हालचालींसाठी आंतरराष्ट्रीय नौवहन नियमांमध्येही विशेष खबरदारीची तरतूद आहे. जहाजांनी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे, परिस्थितीनुसार सुरक्षित वेग राखणे आणि संभाव्य धडक टाळण्यासाठी वेळेवर योग्य दिशेने हालचाल करणे अपेक्षित असते. दोन जहाजे एकमेकांच्या मार्गावर येत असतील, तर परिस्थितीनुसार कोणत्या जहाजाने मार्ग द्यायचा आणि कोणत्या जहाजाने आपला वेग व दिशा कायम ठेवायची, याबाबतही नियम निश्चित आहेत. त्यामुळे लष्करी जहाजांच्या हालचालींमध्ये वेग, अंतर, दिशा आणि सतर्कता यांना विशेष महत्त्व असते.
 
भारत आणि पाकिस्तानच्या नौदलांमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. २०११ मध्ये एडनच्या आखातात पाकिस्तानी पीएनएस बाबर आणि भारतीय आयएनएस गोदावरी यांच्यात जवळीक निर्माण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही भारताने निषेध नोंदवला होता. ताज्या घटनेनंतर भारताने दोन्ही देशांमधील संबंधित करारांचे पालन करण्याची गरज अधोरेखित केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी लष्करी युनिट्सनी समुद्रात अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.