अनैतिक संबंधाच्या संशयातून प्रेयसीवर चाकू हल्ला

महिला गंभीर जखमी, मेयो रुग्णालयात उपचार सुरू

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Knife attack दुसऱ्या युवकासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका ४० वर्षीय व्यक्तीने आपल्या प्रेयसीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईनगर परिसरात घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास साईनगर नाल्याजवळ घडली. मात्र, या प्रकरणाची तक्रार १४ सप्टेंबर रोजी कळमना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
 

Knife attack 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पारडी परिसरातील रहिवासी असून, तिचे जितू नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. आरोपीही पारडी परिसरात राहतो. जितूला आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या युवकासोबतही प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने ४ सप्टेंबरच्या सायंकाळी महिलेला साईनगर नाल्याजवळ गाठले. त्यानंतर चाकूने तिच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जखमी महिलेच्या मुलाने कळमना पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम १३५ तसेच अन्य संबंधित कलमांन्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कळमना पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.