जनावर भरलेला मालवाहू उलटला; ९ जनावरांचा मृत्यू

चिस्तूर येथील घटना

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
वर्धा,
Livestock laden truck overturns कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारा मालवाहू अनियंत्रित होऊन उलटल्याने झालेल्या अपघातात ९ जनावरांचा मृत्यू झाला, तर ४ गोवंश जखमी झाले. ही घटना मंगळवार १५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावरील आष्टी (शहीद) नजिकच्या चिस्तूरजवळ घडली. या अपघातात वाहनचालकही जखमी झाल्याची माहिती आहे.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. १४ ई. एम. ४३१७ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून गोवंशाची वाहतूक करण्यात येत होती. अमरावती जिल्ह्यातील सुफियानगर येथील मोहम्मद इस्राईल नूर मोहम्मद (३५) हा वाहन चालवत होता. त्याच्यासोबत मुस्तकीम शाह शफाकत शाह (३०) हा लिनर होता. चिस्तूरजवळील रामदेव ढाब्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. या अपघातात चालक वाहनाखाली दबला. ही बाब लक्षात येताच ढाब्याचे चालक लुंबाराम दरगुडा यांनी तातडीने तळेगाव पोलिसांना माहिती दिली. गस्तीवर असलेले पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ जेसीबीच्या मदतीने वाहन सरळ करून वाहनाखाली दबलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले.
 
 
यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात १३ गोवंश क्रूरपणे बांधून असल्याचे आढळून आले. सर्व जनावरांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी तळेगाव येथील पशुधन विकास अधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले. तपासणीदरम्यान ९ गोवंश मृत, तर ४ गोवंश जखमी असल्याचे आढळले. जखमी जनावरांना उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी चार गोवंश व वाहनासह ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय गुन्हा दाखल करण्यात आला असून, तळेगाव पोलिस पुढील तपास करीत आहे.