वर्धा जिल्ह्यात महावितरणचा दणका; १५ दिवसात १११ वीजचोर्‍या उघड

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
वर्धा,
mahavitaran जिल्ह्यात विजेचा अपव्यय रोखून वीज हानी नियंत्रणात आणण्यासाठी आणि प्रामाणिक ग्राहकांना अखंडित व उच्च दर्जाचा वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत १ ते १५ सप्टेंबर या अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागांत धडक कारवाई करत तब्बल १११ वीजचोर्‍यांचा पर्दाफाश केला. महावितरणच्या स्थानिक अभियंत्यांनी आणि तांत्रिक कर्मचार्‍यांनी राबवलेल्या या कारवाईमुळे अवैध मार्गाने वीज वापरणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले.
 
 
 
राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या या धडक तपासणी मोहिमेअंतर्गत कर्मचार्‍यांनी शहरी, ग्रामीण, औद्योगिक वसाहती तसेच व्यावसायिक केंद्रांमधील वीज मीटर आणि जोडण्यांची सखोल पाहणी केली. या कारवाईत वर्धा जिल्ह्यातील वर्धा विभागात ३८, आर्वी ३३ आणि हिंगणघाट विभागात ४० अशा १११ वीजचोर्‍या उघडकीस आल्या. या तपासणी दरम्यान मुख्य विद्युत वाहिनीवर थेट हुक टाकून वीज घेणे, मीटर बायपास करणे, सीलशी छेडछाड करणे, मीटर संथ करणे किंवा डिजिटल डिस्प्ले बायपास करणे यासारखे बेकायदेशीर प्रकार निष्पन्न झाले आहेत. या मोहिमेत घरगुती वापरासोबतच काही व्यावसायिक संस्था आणि लहान उद्योगांमधील गैरप्रकारही समोर आले आहेत.
 
 
उघडकीस आलेल्या प्रकरणांमध्ये चोरीच्या विजेचे अचूक मूल्यमापन करून दंडात्मक रकमेची बिले तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोषी आढळलेल्या ग्राहकांवर भारतीय वीज कायद्यान्वये फौजदारी व दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर थेट पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात येत असून अनेक ठिकाणी तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
 
 
वीजचोरीमुळे केवळ महावितरणची आर्थिक हानी होत नसून, रोहित्रांवर अतिरित ताण येऊन ते जळणे, तांत्रिक बिघाड होणे आणि नियमित बिल भरणार्‍या ग्राहकांना कमी दाबाच्या विजेचा त्रास सहन करावा लागणे असे गंभीर परिणाम होतात. त्यामुळे प्रामाणिक ग्राहकांच्या हकाचे संरक्षण करण्यासाठी आणि दर्जेदार वीज सेवेसाठी ही शोधमोहीम आगामी काळात अधिक वेगाने राबवली जाईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब न करता अधिकृत वीज जोडणी घेऊनच सुरक्षित वीज वापरावी, असे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.