हिंदुस्थानी भाऊंच्या वक्तव्याने वादाची ठिणगी

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
मुंबई
Manoj Jarange Patil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, त्यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. विशेष म्हणजे, मागील वर्षी याच कालावधीत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. यंदा मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याचे समोर आले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी तिसऱ्यांदा पोलिसांकडे परवानगी मागितली असून, या अर्जावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
 

Manoj Jarange Patil Mumbai Protest: Hindustani Bhau Targets Jarange Over Ganeshotsav Disruption 
मनोज जरांगे पाटील गेल्या १९ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. १९ तारखेपासून मुंबईत उपोषण करण्याची त्यांनी घोषणा केली आहे. सुरुवातीला त्यांनी पाच हजार कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांचा हा अर्ज रद्द करण्यात आला. त्यानंतर त्यांनी ५० जणांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यासाठी नव्याने परवानगी मागितली आहे. या अर्जावरही पोलिसांकडून निर्णय झालेला नसताना जरांगे पाटील मोठ्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
दरम्यान, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विकास पाठक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर टीका केली आहे. हिंदुस्थानी भाऊ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, त्यांच्या वक्तव्यावरून मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मागील वर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलनादरम्यान परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचा संदर्भ देत हिंदुस्थानी भाऊ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. मागील वेळी मुंबईत आल्यानंतर रस्त्यांवर आणि मॉलमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तसेच अस्वच्छता झाली, असा आरोप त्यांनी केला. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सण साजरा होत असताना आंदोलनामुळे नागरिकांच्या उत्सवावर परिणाम होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.हिंदुस्थानी भाऊ यांनी आपल्या वक्तव्यात जरांगे पाटील यांच्या मागण्यांचाही संदर्भ घेतला. मागील आंदोलनावेळी मराठा समाजाला आपण विजयी झाल्याचे सांगण्यात आले होते; मात्र त्यानंतर कागदपत्रे तपासण्याचा मुद्दा उपस्थित झाला आणि काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले, असा दावा त्यांनी केला. तसेच आंदोलन आणि त्यातून दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे तरुणांच्या कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक परिणाम होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
जरांगे पाटील यांच्या भाषाशैलीवरही हिंदुस्थानी भाऊ यांनी आक्षेप घेतला. विविध राजकीय नेत्यांचा उल्लेख करताना त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा वक्तव्यांमुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असल्याचेही त्यांनी आपल्या टीकेतून नमूद केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे सुरू असलेल्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला अद्याप अधिकृत परवानगी नसणे आणि त्यातच हिंदुस्थानी भाऊ यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद, यामुळे आगामी काळात परिस्थितीकडे प्रशासन तसेच मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.