जरांगे मुंबईकडे निघाले, सरकारचा मोठा निर्णय

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
मुंबई
maratha reservation मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून, गेल्या १८ दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे सांगितले जात असतानाच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले आहे. जरांगे पाटील मुंबईकडे रवाना होत असतानाच राज्य सरकारने मराठा आरक्षणाशी संबंधित कामकाजासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
 

maratha reservation 
राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी नवीन प्रशासकीय भवनात जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रशासकीय इमारतीच्या १२व्या मजल्यावरील पश्चिम बाजूस ऊर्जा विभागाला वाटप करण्यात आलेली जागा आता निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षाला देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कुणबी नोंदींचा शोध घेण्यासह मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याशी संबंधित कामकाजासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध होणार आहे.
सरकारच्या निर्णयानुसार, नवीन प्रशासन भवनाच्या १२व्या मजल्यावरील पश्चिम बाजूस ऊर्जा विभागाला वाटप करण्यात आलेली ९६४.४४ चौरस फूट जागा, प्रत्यक्षात ७७५ चौरस फूट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही जागा आता निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षासाठी वाटप करण्यात येत आहे.
याशिवाय, याच मजल्यावर राज्य निवडणूक आयोगाच्या रोखशाखेला वाटप करण्यात आलेली मात्र अद्याप ताब्यात न घेतलेली ४०० चौरस फूट जागा ऊर्जा विभागाला देण्यात येणार आहे. तसेच या जागेच्या लगत गृह विभागाच्या ताब्यात असलेल्या एकूण ११०३ चौरस फूट जागेपैकी अभिलेखानुसार ८४५.५९ चौरस फूट, म्हणजेच ८४६ चौरस फूट जागा गृह विभागाच्या ताब्यात कायम ठेवण्यात येणार आहे. उर्वरित २५७ चौरस फूट जागा ऊर्जा विभागाला वाटप करण्यात येणार आहे.
मराठा समाजासाठी कुणबी नोंदी शोधण्याचे काम तसेच आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणांचे कामकाज अधिक सुलभ व्हावे, या उद्देशाने या जागेचे वाटप करण्यात आल्याचे सरकारच्या निर्णयातून स्पष्ट होते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेशी संबंधित कामकाजाला प्रशासकीय पातळीवर स्वतंत्र जागा मिळणार आहे.दरम्यान, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षाच्या कामकाजाचा कालावधी संपल्यानंतर या जागेचा ताबा पूर्ववत ऊर्जा विभागाकडे राहणार असल्याचेही सरकारच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.एकीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली असताना दुसरीकडे सरकारने संदीप शिंदे समिती आणि मराठा आरक्षण कक्षाच्या कामकाजासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाकडे मराठा आरक्षणाच्या प्रशासकीय प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.