अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-beltarodi-murder-caseतीन मित्रांमध्ये दारु पिण्यावरुन वाद झाला. त्याने रागाच्या भरात दोन्ही मित्रांना धडा शिकविण्यासाठी बेलतरोडी पोलिस स्टेशन गाठले. मित्रांनी मारहाण केल्याच्या किरकोळ घटनेला ठाणेदाराने गांभीर्याने घेतले. घटनास्थळ दाखविण्याच्या नादात त्या युवकाने हत्याकांड घडविल्याचे स्थळ दाखवले आणि त्यातूनच उघडकीस आले नुकताच घडलेले हत्याकांड. एका मजुराच्या हत्याकांडात तक्रार देण्यासाठी आलेल्या युवकासह तिघांना पोलिसांनी अटक केली. ठाणेदाराने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हत्याकांडाचा छळा लागला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर मनोहर उकडे (३०, रा. नांदगाव, ता. हिंगणघाट. जि. वर्धा) हा अविवाहित युवक २० दिवसांपूर्वी कामाच्या शोधात नागपुरात आला. त्याने बेलतरोडीच्या हद्दीत असलेल्या काही बांधकाम साईट्सवर जाऊन कामाचा शोध घेतला. त्याला काम मिळाले आणि तो इमानेईतबारे काम करीत होता. मात्र, त्याला दारुचे व्यसन होते. बांधकाम ठेकेदाराने कंपनीच्या आवारात दारु पिल्यास कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तो दारु पिण्यासाठी वर्धा रोडवरील जंगलसदृष्य भागात जात होता. गेल्या १५ दिवसांपूर्वी शंकर दारु पिण्यासाठी वर्धा रोडवरील तृप्ती हॉटेल आणि विजयराज बारच्या जवळ असलेल्या जंगलात गेला. त्याने दारु ढोसली आणि मध्यरात्रीच्या सुमारास झोपायला कंपनीकडे निघाला.
कुख्यात गुन्हेगार सनी गायकवाड (२३, कैकाडेनगर), त्याचे साथिदार रोहित खुजणारे आणि तुषार खंडारे हेसुद्धा त्या परिसरात गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी फिरत होते. शंकर रस्त्याने एकटाच दारुच्या नशेत येत असल्याचे बघून सनी गायकवाड याने त्याला थांबवले. त्याच्याकडील १२०० रुपये आणि दारुची बाटली हिसकावली. शंकरने विरोध केला असता सनी, रोहित आणि तुषार यांनी त्याला जबर मारहाण केली. शंकर खाली पडल्यानंतर त्याच्या छातीत जोरजोरात लाथा घातल्या. त्यामुळे शंकरचा जागीच मृत्यू झाला. तीनही आरोपींनी तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी बेलतरोडी पोलिसांना मृतदेह आढळल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
........
आरोपींमध्ये झाला वाद
मंगळवारी दुपारी सनी आणि रोहित या दोघांनी तुषारला मारहाण केली. तो दारुच्या नशेत असताना दोन्ही मित्रांना चांगलाच धडा शिकविण्याच्या नादात बेलतरोडी पोलिस ठाण्यात गेला. त्याने पोलिसांना दोघांनी मारहाण केल्याची तक्रार केली. त्याचवेळी ठाणेदार रविंद्र नाईकवाड यांनी ती तक्रार गांभीर्याने घेतली. त्याला घटनास्थळ दाखविण्यासाठी गाडीत बसवले. त्यामुळे तो गोंधळला. त्याने हत्याकांड घडलेल्या ठिकाणी नेले. याच ठिकाणी मारहाण झाल्याची तक्रार केली.
.........
असे आले हत्याकांड उघडकीस
ठाणेदार नाईकवाड यांनी शंकरच्या हत्याकांडाची फाईल काढली. त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात शंकर जाताना दिसत आहे. त्यानंतर तक्रार देण्यासाठी आलेला युवक तुषार याच्यासह रोहित आणि सनी दिसत होता. संशयावरुन तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच तिघांनीही शंकरचा खून केल्याची कबुली दिली. अशा प्रकारे मित्रांना धडा शिकविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या संशयास्पद वागण्यावरुन हत्याकांड उघडकीस आणले. ही कामगिरी डीसीपी रश्मीथा राव एन. यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रविंद्र नाईकवाड यांच्या नेतृत्वात पीएसआय भदाणे, विजय मालोकार, सुभाष, राजेश तिवारी यांनी केली.
........