अनिल कांबळे
नागपूर,
nagpur crime news दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ६च्या पथकाने एका आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून २ लाख ४० हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला जुनी कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत आंतरराज्यीय वाहनचोराला अटक केली. कारवाईमुळे जुनी कामठी, एमआयडीसी आणि राणा प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकूण ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. आशुतोष रतिराम यादव (१९, सुनवारा, ता. घनोरा, जि. सिवनी, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार बलराम दुबे (१९, शुक्लानगर, लखनौ रोड, जबलपूर, मध्यप्रदेश) हा सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
माहितीनुसार, ३१ ऑगस्ट दरम्यान जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामठी-कन्हान रस्त्यावरील एका दुकानासमोरून निखिल सुरेश नगरकर (३१, हरदासनगर, कामठी) यांची दुचाकी (एमएच ४० डीएफ ५३८०) अज्ञात चोरट्याने लांबवली होती. या प्रकरणी जुनी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाचे पोलिस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी आशुतोष यादव याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने कामठीतील दुचाकी चोरीसह एमआयडीसी हद्दीतील एक आणि राणा प्रतापनगर हद्दीतील एक अशा एकूण तीन दुचाकी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून २ लाख ४० हजार रुपयांच्या तीन दुचाकी जप्त केल्या. जप्त साहित्यासह आरोपीला पुढील कारवाईसाठी जुनी कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त डॉ. नविनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल आणि सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-६चे पोलिस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांच्या पथकाने केली.