अनिल कांबळे
नागपूर
nagpur crime news प्रियकरासोबत लग्न करण्यास त्याच्या कुटुंबीयांनी विरोध केला. त्यामुळे चिडलेल्या २२ वर्षीय प्रेयसीने प्रियकराच्या घरात गोंधळ घातला. त्यामुळे चिडलेल्या कुटुंबियांनी त्या तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही घटना महाल परिसरात घडली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्रियकराच्या कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये प्रियकराची ५५ वर्षे वयाची आई, वडील, काका आणि भाऊ यांचा समावेश आहे. हे सर्व महाल परिसरातील रहिवासी आहेत. छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या या तरुणीचे शोएब (२९) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. शोएबने लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, तो वारंवार लग्न पुढे ढकलत असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. १० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तरुणी शोएबला भेटण्यासाठी नागपुरात आली. ती प्रियकराच्या घरी गेली. त्यावेळी शोएब घरी नव्हता. घरात त्याची आई, वडील, काका आणि भाऊ उपस्थित होते. या चौघांनी शोएबसोबत लग्न करण्यास विरोध करीत तिच्याशी वाद घातला. वाद वाढल्यानंतर शोएबची आई आणि भावाने तिचे दोन्ही हात पकडून तिला जमिनीवर ढकलले. यावेळी शोएबच्या वडिलांनी तिच्याशी अश्लील चाळे केले तर काकाने तिच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या लैंगिक छळ, मारहाण, दुखापत करणे, धमकी देणे तसेच समान उद्देशाने केलेल्या कृत्याशी संबंधित कलमांनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.