अनिल कांबळे
नागपू
nagpur cyber fraud हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून खात्यातील रक्कम परस्पर वळवून तसेच एटीएम व पीओएस मशीनद्वारे पैसे काढून घेतल्याचा प्रकार हुडकेश्वर परिसरात उघडकीस आला. या सायबर फसवणुकीत एका ४१ वर्षीय वाहतूक व्यावसायिकाला तब्बल ८ लाख ४९ हजार ९९९ रुपयांचा फटका बसला. आशिक सहारे (४१), रा. बेलदारनगर, हुडकेश्वर, असे तक्रारदाराचे नाव आहे.

सहारे यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस-२५ हा मोबाईल १० सप्टेंबरच्या सुमारास हरवला होता. तक्रारीनुसार, अज्ञात आरोपीने हरवलेल्या मोबाईलचा गैरवापर करून त्यातील इंटरनेट बँकिंग सुविधेचा अनधिकृतपणे वापर केला. आरोपीने सहारे यांच्या इंडसइंड बँकेच्या खात्यातून पैसे दुसरीकडे वळविले. त्यानंतर विविध एटीएम आणि पीओएस मशीनच्या माध्यमातून रोख रक्कम काढून घेतली. खात्यातील अनधिकृत व्यवहार लक्षात आल्यानंतर सहारे यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमांमध्ये फसवणूक आणि ओळख चोरीशी संबंधित तरतुदी आहेत. अद्याप आरोपीची ओळख पटलेली नसून त्याला अटक करण्यात आलेली नाही. बँक खात्यातील व्यवहारांची माहिती घेत आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.