प्रभाग ११च्या विकासासाठी हातात भांडे घेऊन ‘भीक’

शैलेश पांडे यांच्या अनोख्या टी-शर्टने वेधले लक्ष

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
नागपूर,
nagpur-nmc-fund-protestमहानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नगरसेवक शैलेश पांडे यांनी बुधवारी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. मनपाच्या सर्वसाधारण सभेपूर्वी त्यांनी घातलेल्या टी-शर्टवरील घोषणांनी सभागृहाबाहेर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मारबत उत्सवासाठी करण्यात आलेली २ कोटी रुपयांची तरतूद, श्रावण महोत्सव, पदग्रहण समारंभ तसेच पदाधिकाऱ्यांच्या कक्षांच्या दुरुस्तीसाठी होणारा खर्च यावर त्यांनी सवाल उपस्थित केले.
 
111
पांडे यांच्या टी-शर्टवर ‘मनपाच्या पैशाची उधळपट्टी’ असा ठळक संदेश होता. त्याखाली मारबत उत्सवासाठी २ कोटी रुपये, श्रावण महोत्सव, पदग्रहण समारंभ, पदाधिकाऱ्यांच्या कक्षांसाठी लाखो रुपयांचा खर्च तसेच ‘५ लाख झाडांचे वृक्षारोपण कागदावरच?’ अशा मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते.
 
मारबत महोत्सवासाठी यंदा मनपाच्या अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली आहे.
 
‘विकास निधीवर फक्त भाजप नगरसेवकांचा हक्क आहे का?’
दरम्यान, प्रभाग क्रमांक ११च्या विकासासाठी निधी मिळत नसल्याचा आरोप करत पांडे यांनी मनपा इमारतीबाहेर हातात प्रतिकात्मक भांडे घेऊन ‘भीक मागो’ आंदोलन केले. विकास निधीच्या वाटपात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांमध्ये भेदभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
‘नागपूरच्या सर्वसाधारण विकास निधीवर केवळ भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचाच हक्क आहे का?’, असा सवाल पांडे यांनी उपस्थित केला.
 
महानगरपालिकेच्या विविध प्रभागांना वितरित करण्यात आलेल्या विकास निधीची संपूर्ण यादी सार्वजनिक करावी, तसेच कोणत्या प्रभागाला किती निधी मंजूर झाला, कोणत्या कामांसाठी निधी देण्यात आला आणि प्रत्यक्षात किती निधी खर्च झाला, याचा तपशील नागपूरकरांसमोर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
 
पांडे यांच्या आंदोलनामुळे मनपातील निधीवाटपातील पारदर्शकता आणि विकासकामांसाठी उपलब्ध निधीच्या प्राधान्यक्रमाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.