भाईंदरमधील जमीन वादाला नवे वळण

आमदाराने तक्रारही मागे घेतली

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
मुंबई,
New twist in Bhayandar land dispute मुंबईतील मीरा रोडचे ८१ वर्षीय रहिवासी असगर अली वोरा आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील भाईंदरमधील जमीन वादाला आता नवे वळण मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शाळेतील वर्गमित्र असलेल्या वोरा यांनी ८ सप्टेंबर रोजी मोदींची भेट घेऊन भाईंदरमधील त्यांच्या जमिनीबाबत तक्रार मांडली होती. त्यानंतर मंगळवारी झालेल्या प्रशासकीय बैठकीत नरेंद्र मेहता यांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत असल्याचे तसेच त्या भूखंडासाठी मिळालेली बांधकाम परवानगी परत करत असल्याचे नगररचना विभागाला कळवले.
 

New twist in Bhayandar land dispute 
 
वोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी १९८९ मध्ये भाईंदर पूर्वेतील नवघर परिसरात सुमारे २,८१० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. त्यांचा आरोप आहे की, २०११ मध्ये या जमिनीवर स्वयं बिल्डर्स आणि नरेंद्र मेहता यांच्याशी संबंधित सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्सने ताबा घेतला. गेल्या सुमारे १५ वर्षांपासून महसूल विभाग, महापालिका आणि पोलिसांकडे ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. या प्रकरणात २०१५ मध्ये एफआयआर दाखल झाला असून, संबंधित न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. हे आरोप वोरा यांनी केले असून, त्यावरील अंतिम कायदेशीर निष्कर्ष संबंधित न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रियेवर अवलंबून आहेत.
 
वोरा आणि नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील वडनगर येथील बी.एन. स्कूलमध्ये शिक्षण झाले आहे. ८ सप्टेंबरच्या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीला असगर अली वोरा, नरेंद्र मेहता, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त राधा विनोद शर्मा आणि नगर नियोजक पुरुषोत्तम शिंदे उपस्थित होते. बैठकीदरम्यान मेहतांनी वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडण्याचे आणि बांधकामाची परवानगी परत करण्याचे पत्र दिले. तसेच पोलिस आयुक्तांना स्वतंत्र पत्र देत, दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाल्याचे सांगून वोरा यांच्याविरोधातील पूर्वीची तक्रार मागे घेण्याची माहिती दिली. मेहतांच्या पत्रानुसार, संबंधित जमीन २०१९ मध्ये मर्विन फर्नांडिस यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती.