आता ‘आदिवासी स्कूल ठीक करो’

सीजेपीकडून आदिवासी भागातील शाळांची पाहणी

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
नागपूर
CJP  सरकारी शाळांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने आता आदिवासी भागातील शाळांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून बुधवारी नागपुरात ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ या नव्या मोहिमेची घोषणा करण्यात आली. या अभियानाच्या माध्यमातून आदिवासीबहुल भागांमधील शाळांना भेटी देऊन तेथील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांची परिस्थिती आणि उपलब्ध सोयी-सुविधांची पाहणी केली जाणार आहे.
 

CJP  
भारतामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि झारखंडसह विविध राज्यांमध्ये आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. या भागांतील शाळांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न या मोहिमेतून केला जाणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले.
नीट पेपरफुटीच्या विरोधात जंतर-मंतरवर महिनाभर आंदोलन केल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्याचा दावा कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके यांनी केला. त्यानंतर काही दिवसांपासून ‘स्कूल ठीक करो’ अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधील सरकारी शाळांची परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय कर्नाटक, झारखंड आणि पंजाबमधील काही शाळांचीही पाहणी करण्यात आल्याचे दीपके यांनी नमूद केले.
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील CJP बालाघाट येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा संशयित मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर अभिजीत दीपके यांनी संबंधित शाळेला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर आदिवासी भागातील शाळांची व्यापक पाहणी करण्यासाठी स्वतंत्र मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अभिजीत दीपके यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. भारताला स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, तरी आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळांच्या विकासाकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचा आरोप त्यांनी केला. वेगवेगळ्या सरकारांनी आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष केले असून, या परिस्थितीसाठी कोणतेही एक सरकार जबाबदार नसून आतापर्यंतची सर्व सरकारे जबाबदार असल्याचे दीपके यांनी म्हटले. ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत आदिवासी भागातील विविध शाळांना भेटी देण्यात येणार आहेत. या शाळांना सरकारकडून कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, प्रत्यक्षात त्या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात का आणि विद्यार्थी कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेत आहेत, याची पाहणी केली जाणार असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले.आदिवासी भागातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये क्षमतेची कोणतीही कमतरता नसून, त्यांना आवश्यक त्या सुविधा आणि सरकारी मदतीचा अभाव असल्याचा दावा दीपके यांनी केला.दरम्यान, महाराष्ट्रात मागील दोन वर्षांत ५९० हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषदेत केला. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे मृत्यू मुंबईत झाले असते, तर देशभरात खळबळ उडाली असती, असे ते म्हणाले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाला कोणतीही किंमत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये मागील तीन महिन्यांत ३० हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याची माहितीही दीपके यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आदिवासी भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ अभियानातून केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.