57 धावांची खेळी अन् टीकाकारांना उत्तर!

सॅमसनचा स्पष्ट संदेश

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
काबूल,
Samson's clear message अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने दमदार फलंदाजी करत टीकाकारांना आपल्या खेळातून उत्तर दिले. पहिल्या सामन्यात लवकर बाद झाल्यानंतर संघातील त्याच्या स्थानावर माजी क्रिकेटपटूंसह अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या टी-20 सामन्यात सॅमसनने अवघ्या 22 चेंडूंत 57 धावांची आक्रमक खेळी केली. त्याच्या या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
 
 
356
 
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत सॅमसनने त्याच्यावर होणाऱ्या टीकेबाबत मनमोकळेपणाने भाष्य केले. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि माजी खेळाडूंच्या वक्तव्यांचा परिणाम होत असल्याचे त्याने स्पष्ट केले. सॅमसन म्हणाला की, वरिष्ठ खेळाडू काही बोलतात किंवा सोशल मीडियावर टीका होते, हे क्रिकेटमध्ये सामान्य आहे. मात्र, आपण रोबोट किंवा मशीन नसल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम होत नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. टीकेचा जास्त विचार केल्यास त्याचा थेट परिणाम फलंदाजीवर होऊ शकतो. एखादा फटका खेळण्यापूर्वीच ‘मी बाद झालो तर पुन्हा हीच समस्या निर्माण होईल का?’ असा विचार मनात येऊ लागतो, त्यामुळे स्वतःशी संवाद साधत या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.
 
 
सॅमसनने टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारताच्या विजेतेपदाच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्याने मिळवला होता. मात्र, त्यानंतर आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवरील टी-20 मालिकांमध्ये त्याची बॅट शांत राहिल्याने त्याला संघातील स्थान गमवावे लागले. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यासाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आला नव्हता. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो लवकर बाद झाल्यानंतर टीकेला सामोरे गेला. दुसऱ्या सामन्यात 57 धावांची खेळी केल्यानंतर सॅमसनने वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांचाही उल्लेख केला. संघाला प्रथम विजय मिळवून देणे हेच आपले ध्येय असल्याचे सांगत संधी मिळाली नाही किंवा इतर खेळाडूंना संधी मिळाली याचा नकारात्मक विचार करत बसता येत नाही, असे त्याने स्पष्ट केले.