‘सेकंड फ्लोर कॅफे’मध्ये हुक्का पार्लर छापा

कॅफे मालक, दोन वेटरसह २३ जणांवर गुन्हा

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,

second floor cafe सीताबर्डी पोलिस ठाणे हद्दीतील लक्ष्मीभवन चौकाजवळ असलेल्या ‘सेकंड फ्लोर कॅफे’वर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री धाड टाकून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा प्रकार उघडकीस आणला. दरवाजे आतून-बाहेरून बंद करून गुपचूप हा प्रकार सुरू होता. कारवाईत पोलिसांनी कॅफे मालक, दोन वेटर आणि २३ ग्राहकांसह एकूण २६ जणांवर गुन्हा दाखल केला. सीताबर्डी ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचे या कॅफेकडे विशेष ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होते. सीताबर्डी पोलिसांच्याच आशिर्वादाने येथे हुक्का पार्लर सुरु होते, अशी चर्चा आहे. ठाणेदाराचे ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.
 

second floor cafe hookah parlour raid in nagpur, 26 booked 
गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून सीताबर्डी परिसरातील ‘सेकंड फ्लोर कॅफे’मध्ये शासन निर्धारित वेळमर्यादेपेक्षा अधिक काळ आस्थापना सुरू ठेवून बेकायदेशीरपणे हुक्का पुरवला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून पथकाने छापा टाकला असता, बाहेरून कुलूप लावून आतमध्ये ग्राहकांना प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पुरवला जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी दुसऱ्या मार्गाने आत प्रवेश केला असता, तेथे कॅफे मालक सन्नी विकास बोरकर (२६, धरमपेठ) हा वेटर सार्थक बाबाराव पखाले आणि हर्ष नरेश धुर्वे यांच्या मदतीने २३ तरुण-तरुणींना हुक्का पुरवताना सापडला. चौकशीदरम्यान मालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पॉट, हुक्का नळ्या, विविध फ्लेव्हरची तंबाखू, दोन एलईडी टीव्ही, सोफा सेट, रेफ्रिजरेटर आणि डीव्हीआर असा एकूण २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींवर सिताबर्डी पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त साहित्यासह सर्व आरोपींना पुढील तपासासाठी सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.