नवी दिल्ली,
shubman gill भारतीय क्रिकेट संघाची पुढील एकदिवसीय मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध होणार असून २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान तीन सामन्यांची ही मालिका खेळवली जाणार आहे. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांची एकदिवसीय संघात निवड होण्याची शक्यता आहे. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका भारताने १-२ अशी गमावली असली तरी आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत भारतीय फलंदाजांचा वरचष्मा कायम आहे. शुभमन गिल ८०१ गुणांसह एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत जगात अव्वल स्थानावर आहे. काही दिवसांपूर्वी त्याने न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला मागे टाकत पहिले स्थान मिळवले.

मिचेल दुसऱ्या क्रमांकावर असून विराट कोहली तिसऱ्या, तर रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. २०२६ मधील एकदिवसीय सामन्यांमध्ये गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला असून त्याने आतापर्यंत आठ डावांत एक शतक आणि पाच अर्धशतकांच्या मदतीने ५६१ धावा केल्या आहेत.अव्वल सात फलंदाजांमध्ये शुभमन गिल, डॅरिल मिचेल, विराट कोहली, रोहित शर्मा, अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान, पाकिस्तानचा बाबर आझम आणि इंग्लंडचा जो रूट यांचा समावेश आहे. भारताच्या अव्वल ५० फलंदाजांमध्ये पाच खेळाडू आहेत. गिल पहिल्या, विराट तिसऱ्या, रोहित चौथ्या, श्रेयस अय्यर १२व्या आणि केएल राहुल १७व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारताकडून केवळ कुलदीप यादवचा समावेश असून तो दहाव्या स्थानावर आहे.