सिरोंचा,
sironcha to get a new electricity अतिदुर्गम आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या सिरोंचा तालुक्याच्या वीजपुरवठ्याला आता मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याला अधिक दर्जेदार आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी तेलंगणा राज्यातून पर्यायी वीजपुरवठ्याची व्यवस्था उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी रविवारी, 13 सप्टेंबर रोजी सिरोंचा येथे भेट देत सुरू असलेल्या वीजयंत्रणेच्या विविध कामांची पाहणी करून अधिकार्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

सध्या सिरोंचा येथील महापारेषणच्या 66/33 केव्ही उपकेंद्राला आलापल्ली येथील 132/66 केव्ही उपकेंद्रातून तब्बल 93 किलोमीटर लांबीच्या 66 केव्ही वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. या मार्गातील जीमलगट्टा परिसरातील घनदाट जंगल, नदी-नाले आणि पावसाळ्यातील प्रतिकूल परिस्थितीमुळे वीजवाहिनीत बिघाड झाल्यास तो शोधून दुरुस्त करणे मोठे आव्हान ठरते. त्यातच अनेक भागांत मोबाईल नेटवर्कची सुविधा अत्यल्प असल्याने दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण होतात.
या पृष्ठभूमीवर सिरोंच्यापासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील किस्तमपेठ, जिल्हा मंचेरियल येथून सिरोंचापर्यंत 132 केव्ही अतिउच्चदाबाची नवीन वीजवाहिनी उभारण्यात येत आहे. महापारेषणकडून या मार्गावर तब्बल 113 टॉवर उभारण्याचे काम सुरू असून, येत्या जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही वाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर सिरोंचा तालुक्याला आलापल्लीसोबतच किस्तमपेठ या दुसर्या मार्गानेही वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, सिरोंचा येथील महापारेषणच्या 66/33 केव्ही उपकेंद्राची 132/66/33 केव्ही क्षमतावाढीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच महावितरणच्या विविध उपकेंद्रांमध्ये आवश्यक नूतनीकरणाची कामे सुरू आहेत. सिरोंचा येथील नवीन 33/11 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित झाले असून, त्यात 5 एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. वाढती वीज मागणी लक्षात घेता आणखी 5 एमव्हीए क्षमतेचा एक पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याची सूचना संचालक धनंजय औंढेकर यांनी केली.