विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेटचा अतिवापर टाळावा

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर,
students-mobile-addictionमोबाईल आणि इंटरनेट हे ज्ञान व माहिती मिळविण्याचे प्रभावी साधन असले, तरी त्याचा अतिवापर विद्यार्थ्यांसाठी घातक ठरू शकतो. सोशल मीडियावर अनावश्यक वेळ न घालवता विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर प्रामुख्याने अभ्यास आणि आवश्यक माहिती मिळविण्यासाठी करावा. तसेच इंटरनेट वापरताना वैयक्तिक व गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ मुजावर अली यांनी केले.
 
addiction
 
 
जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत मुरलीधर बागला हायस्कूल येथे सायबर गुन्हे, सुरक्षित इंटरनेट वापर आणि पॉक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्य चरणदास राठोड, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, शिक्षिका भावना कोटनाके, प्रवीण गोरकर आदी उपस्थित होते.
 
अली म्हणाले, पालकांचा मोबाईल वापरताना आर्थिक व्यवहारांशी संबंधित ॲप्स हाताळताना विशेष काळजी घ्यावी. फोनपे, गुगल पे यांसारख्या डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर करताना ओटीपी, पासवर्ड, यूपीआय पिन अथवा बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये. मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाऊनलोड करताना ते विश्वासार्ह आहे की नाही, याची खात्री करावी. प्रत्येक ॲपला सरसकट सर्व परवानग्या देणे टाळावे.
 
आपली गोपनीय माहिती, छायाचित्रे, पासवर्ड किंवा इतर संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींशी अथवा सार्वजनिक माध्यमांवर शेअर करू नये. कोणतीही आपत्कालीन किंवा अनुचित घटना घडल्यास ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधता येतो. ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाईनवर संपर्क साधावा.