४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस उलटली

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
बारामती
supe ghat सुमारे ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसला सुपे घाटात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. पाटस येथून सकाळी सातच्या सुमारास सुटलेली ही बस कुसेगाव, पडवी आणि गायकवाड मळा मार्गे सुपे घाटातून विद्याप्रतिष्ठानच्या संकुलाकडे जात असताना घाटात उलटली. या अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
 

supe ghat 40 students on board st bus overturns in supe ghat near baramati, 4-5 injured 
पाटस येथून विद्यार्थ्यांना घेऊन निघाल्यानंतर बस नियोजित मार्गाने पुढे जात होती. मात्र, सुपे घाटात पोहोचल्यानंतर बसचा अपघात झाला. घटनेनंतर जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातात काही विद्यार्थ्यांना दुखापत झाली असली, तरी कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरून संबंधितांकडून अपघाताची माहिती घेतली. त्यांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच डॉक्टरांशी संपर्क साधून जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमी विद्यार्थ्यांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणि योग्य आरोग्यसेवा तातडीने मिळावी, यासाठी डॉक्टरांना आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत ट्विट करत एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून, सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही आणि सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एसटी महामंडळाच्या supe ghat सेवेबाबतही रोहित पवार यांनी चिंता व्यक्त केली. गेल्या आठवड्यात स्वारगेटहून बारामतीकडे जाणाऱ्या सलग दोन बस बंद पडल्याने प्रवाशांना तिसऱ्या बसमध्ये बसवावे लागले होते आणि त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले, असा उल्लेख त्यांनी केला. यापूर्वीच्या परिवहन आयुक्तांचा कार्यकाळ स्वच्छ कारभाराऐवजी काळाबाजार करण्यात गेल्यामुळे एसटी महामंडळावर वारंवार अशी वेळ येत असल्याचे दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.सुपे घाटातील या अपघाताची प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांसह एसटीने प्रवास करणाऱ्या कोणत्याही सामान्य नागरिकाचा जीव धोक्यात येणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, या घटनेनंतर बसच्या स्थितीसह अपघाताच्या अन्य कारणांची चौकशी होणे अपेक्षित आहे.