सूर्या-ज्योतिकाने पुन्हा घेतल्या विवाहाच्या शपथा

मुलांसह कुटुंबीयांच्या उपस्थितीत भावनिक सोहळा

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
मुंबई
surya and jyothika अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री ज्योतिका यांनी 2006 मध्ये विवाह केला. वैवाहिक आयुष्याला दोन दशके पूर्ण होत असताना या दोघांनी आपल्या नात्यातील प्रेम आणि बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी विवाहाच्या शपथा नव्याने घेण्याचा निर्णय घेतला. परदेशातील एका चर्चमध्ये हा खास सोहळा पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी ज्योतिका पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये, तर सूर्या पांढरा कोट आणि काळ्या पँटमध्ये दिसला.
 

surya and jyothika renew wedding vows after 20 years in a special ceremony abroad 
या खास प्रसंगी त्यांची मुलगी दिया आणि मुलगा देव यांच्यासह कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. सूर्या याचा भाऊ आणि अभिनेता कार्ती यानेही या सोहळ्याला हजेरी लावली. ज्योतिका मुलासोबत चर्चमधील आयलमधून चालत येतानाचा क्षण आणि तिला पाहून सूर्या भावूक झाल्याचे दृश्य सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
या सोहळ्यानंतर ज्यातिकाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत या विशेष दिवसामागची भावना व्यक्त केली. तिच्या मते, हा सोहळा केवळ एखाद्या ‘परिपूर्ण’ वैवाहिक आयुष्याचा उत्सव नव्हता. गेल्या वीस वर्षांच्या सहजीवनात आलेले प्रेम, मतभेद, एकमेकांना समजून घेण्याचे प्रयत्न, तडजोडी, त्याग आणि नि:स्वार्थ प्रेम या सर्व अनुभवांचा हा उत्सव असल्याचे तिने नमूद केले.नव्याने घेतलेल्या विवाहाच्या शपथांमध्ये ज्योतिकाने आयुष्यात आनंदी राहण्यासोबतच जीवनातील अपूर्णतांचाही स्वीकार करण्याचा उल्लेख केला. तसेच आपल्या मुलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्यामुळे आयुष्य अधिक समृद्ध झाल्याची भावना तिने व्यक्त केली.
सूर्या आणि ज्योतिका यांनी या खास सोहळ्याला ‘द सिकल’ असे नाव दिले आहे. दोन दशकांच्या वैवाहिक प्रवासातील चढ-उतार, अनुभव आणि एकत्र केलेल्या वाटचालीनंतर नव्याने घेतलेल्या या शपथांमुळे त्यांच्या नात्याचा हा महत्त्वाचा टप्पा अधिक संस्मरणीय ठरला आहे.
सूर्या आणि ज्योतिका यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 1999 मध्ये दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केले आणि त्यानंतर त्यांच्या नात्याला वेगळे वळण मिळाले. अखेर 2006 मध्ये दोघांनी विवाह केला. आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याला वीस वर्षे पूर्ण होत असताना या भावनिक सोहळ्यामुळे सूर्या-ज्योतिकाच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.