आशियाई क्रीडा स्पर्धेआधी टीम इंडियाला धक्का!

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Team India ahead of the Asian Games २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून पुरुषांची क्रिकेट स्पर्धा २४ सप्टेंबरपासून रंगणार आहे. मात्र, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान त्याला बाजूच्या स्नायूला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला त्या मालिकेतूनही माघार घ्यावी लागली होती.
 
 

355657
 
पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने वरुण दीर्घकाळासाठी मैदानाबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याच्या जागेसाठी कुलदीप यादव आणि विप्रज निगम हे दोन पर्याय समोर आले आहेत. मात्र, कुलदीप यादव याच महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता असल्याने त्याला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलमध्ये खेळणारा विप्रज निगम वरुणचा पर्याय ठरू शकतो. निगम लेग-स्पिन गोलंदाजी करतो. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत ३३ सामने खेळताना ३४ बळी घेतले आहेत. फलंदाजीतही योगदान देण्याची क्षमता असलेल्या निगमच्या नावावर टी-२०मध्ये २४४ धावा असून त्याची सर्वोच्च धावसंख्या ३९ आहे.
 
 
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना १३ सप्टेंबरला अरुण जेटली स्टेडियमवर झाला होता. या सामन्यात वरुणने ४ षटकांत केवळ १६ धावा देत एका फलंदाजाला बाद केले होते. सामन्यानंतर करण्यात आलेल्या एमआरआय तपासणीत त्याला बाजूच्या स्नायूला दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तो अफगाणिस्तान मालिकेतून बाहेर झाला आणि आता आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघातूनही त्याला बाहेर पडावे लागू शकते. पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत एकूण १० देश सहभागी होणार असून मानांकन पद्धतीमुळे भारत, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना २८ सप्टेंबरला होणार आहे.