तहसिलदार करणार आष्टी नपंच्या कामकाजाची चौकशी

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
तळेगाव (श्या.पं.),
tehsildar आष्टी नगरपंचायत कार्यालयातील मुख्याधिकार्‍यांचे नियमबाह्य कामकाज, नगराध्यक्षांचे गैरवर्तन तसेच निविदा प्रक्रियेबाबत अनियमितता असल्याच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीसाठी आष्टी येथील तहसीलदारांची चौकशी अधिकारी म्हणून नियुती करण्यात आली आहे. आष्टी नपंच्या नऊ नगरसेवकांनी आमदार सुमित वानखेडे यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करून नगरपंचायतीतील विविध कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली होती. तक्रारीची दखल घेऊन आमदार वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.
 
 
 
नगरसेवकांनी केलेल्या तक्रारीमध्ये नगरपंचायतीतील विविध विकासकामांच्या ई-निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता, निविदा मंजुरी व कंत्राटदारांशी संबंधित प्रक्रिया, मुख्याधिकारी यांच्या कामकाजाची पद्धत तसेच नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. काही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशीची प्रक्रिया सुरू केली असून आष्टी तहसीलदारांकडून संबंधित कागदपत्रे, निविदा प्रक्रिया व नगरपंचायतीच्या कामकाजाची पडताळणी केली जाण्याची शयता आहे. चौकशीअंती वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
 
 
या तक्रारीवर सीमा निंबकर, माधुरी सोनटके, शेख नसीर शेख, सीमा सतपाल, शेख रेहान कुरेशी, रामकृष्ण सुरजुसे, संजय शिरभाते, मीना डोईफोडे आणि अ‍ॅड. मनिष ठोंबरे या नऊ नगरसेवकांच्या स्वाक्षर्‍या असल्याचे सांगण्यात आले. आता तहसीलदारांच्या चौकशीकडे नगरपंचायत प्रशासनासह आष्टीकरांचे लक्ष लागले असून, चौकशीत नेमकी कोणती वस्तुस्थिती समोर येते आणि त्यानुसार प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.