वर्धा,
raipur jungli सेलू तालुयातील रायपूर जंगली येथे ९ रोजी वाघाच्या हल्ल्यात भगवान धुर्वे यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी १ कोटीच्या मागणीसाठी अन्त्यसंस्कार करण्यास नकार देत मृतदेह परत पाठविला होता. १५ रोजी खा. अमर काळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. यावेळी आ. रोहित पवार यांनी आंदोलनात हजेरी लावत सरकारवर ताशेरे ओढले. अखेर रात्री ८.३० वाजताच्या सुमारास प्रशासन आणि मृतकाचे कुटुंबीयांमध्ये वाटाघाटी झाल्या. आज १६ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास अन्त्यसंस्कार करण्यात आले.
बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मृत शेतकर्यांची मुलं, काँग्रेस नेते शेखर शेंडे, डॉ. अभ्युदय मेघे, शप गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, सौरभ शेळके, भाजपाचे पृथ्वीराज शिंदे, निहाल पांडे, ग्रामस्थ तर प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, बोरचे उपसंचालक मंगेश ठेंगडी आदी उपस्थित होते.
या बैठकीत शासन निर्णयाप्रमाणे २५ लाख रुपये, आदिवासी विकास विभाग व वनविभाग यांना प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे विशेष बाब म्हणून प्रस्ताव पाठविण्याबाबत व त्याचा पाठपुरावा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आदिवासी विभागामार्फत आकस्मिक निधी ५० हजार रुपये, कुटुंबातील एकाला हंगामी वनमजूर म्हणून घेण्यात येईल, आदिवासी विभागामार्फत असलेल्या न्युलिअस योजनेतून बचत गटामार्फत अनुदान ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पीडित कुटुंबाला घरकुल तसेच मृतकाच्या दोन्ही नातवंडांचा शिक्षणाचा खर्चही उचलण्यात येणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपये देण्याची मागणीही शेखर शेंडे यांनी केली होती. यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
यासोबतच वनविभागाने वाघांची वाढती संख्येवर उपाययोजना, प्राथमिक प्रतिसाद पथक स्थापन करणे, सर्वेलन्स कॅमेर्यांची संख्या वाढविणे, जनजागृती करणे, ग्रामपंचायत तर्फे ग्रामसभेचा ठराव प्राप्त झाल्यानंतर वनविभागामार्फत पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे आश्वासनही देण्यात आले.