इस्त्रायलसाठी ट्रम्पांचा ४० हजार बॉम्बचा प्लॅन!

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's plan for 40,000 bombs for Israel मध्य-पूर्वेतील संघर्षाची तीव्रता कायम असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून इस्त्रायलला मोठ्या प्रमाणावर शक्तिशाली बॉम्बचा पुरवठा करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. प्रस्तावित लष्करी करारांतर्गत इस्त्रायलला २ हजार पौंड वजनाचे तब्बल ४० हजार बॉम्ब देण्याची योजना असल्याचे सांगितले जात आहे. हेच शक्तिशाली बॉम्ब गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस आणि जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने यापूर्वी रोखले होते.
 
 

Trump 
 
दोन अमेरिकी अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, सुमारे २.८ अब्ज डॉलरच्या या पॅकेजमध्ये ४० हजार बॉम्बचा समावेश करण्याची तयारी आहे. मात्र, या प्रस्तावाला अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाही. या संभाव्य कराराबाबत अमेरिकी काँग्रेसलाही अनौपचारिक माहिती देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यवहारातील रक्कम प्रामुख्याने परदेशी लष्करी वित्तपुरवठा कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली जाण्याची शक्यता आहे. या व्यवस्थेत अमेरिकी करदात्यांच्या निधीतून इस्त्रायलला आर्थिक मदत दिली जाते आणि त्याच रकमेतून इस्त्रायल अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची खरेदी करतो.
 
इस्त्रायलची लष्करी क्षमता वाढवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमधील हा प्रस्तावित व्यवहार ताजा निर्णय मानला जात आहे. या शस्त्रविक्रीची माहिती सर्वप्रथम ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केल्याचे सांगितले जाते. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या इस्त्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव समोर आला आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्त्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम झाला असला तरी या काळात हिंसाचाराच्या घटना सुरू राहिल्या. गाझामधील संघर्षात इस्त्रायली नागरिकांसह हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या ऑगस्टमध्ये इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा करताना हमास शस्त्रे खाली ठेवण्याऐवजी गाझामध्ये पुन्हा आपले पाय रोवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते.