अनिल कांबळे
नागपूर, काटोल,
gaurai visarjan गौराई विसर्जनासाठी आईसोबत तलावावर गेलेल्या दोन १३ वर्षीय बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता झिलपा शिवारातील तलावावर घडली. आयुष हरीष कुमरे आणि दर्शन धनराज लाड (दोघेही रा. झिलपा) अशी मृत बालकांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण झिलपा गावावर व क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गावातील महिला गौराई विसर्जनासाठी सकाळी झिलपा शिवारातील तलावावर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत काही मुलेही पाण्यात उतरली होती. विसर्जन सुरू असताना आयुष आणि दर्शन हे दोघे पाण्यात अचानक बुडाल्याचे निदर्शनास आले. आरडाओरडा ऐकताच नातेवाइकांनी व उपस्थितांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. आयुष आणि दर्शनच्या काकांनी पाण्यात उतरून दोन्ही बालकांना बाहेर काढले आणि तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले.
आयुष हा आठवीत तर दर्शन सातवीत शिकत होता. विशेष म्हणजे, दोघेही स्थानिक जय भवानी क्रीडा मंडळाचे हुशार कबड्डी खेळाडू होते. खेळाची आवड असलेल्या या दोन उगवत्या ताऱ्यांच्या अकाली निधनाने क्रीडाप्रेमींसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. या घटनेने गावात आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर तीव्र दुःखात झाले आहे.