डब्ल्यूपीएल लिलावाची तारीख ठरली!

    दिनांक :16-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
wpl auction date finalized महिला प्रीमियर लीगच्या आगामी हंगामासाठी तयारीला वेग आला असून, खेळाडूंच्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने १६ सप्टेंबर रोजी पाचही फ्रँचायझींना लिलावाबाबतची माहिती दिली. त्यानुसार २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे डब्ल्यूपीएलच्या पाचव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यामुळे आता सर्व संघांचे लक्ष लिलावापूर्वीच्या संघबांधणीकडे लागले आहे.
 
wpl auction date finalized
 
लिलावाआधी फ्रँचायझींना आपल्या संघातील खेळाडूंना कायम ठेवायचे की मुक्त करायचे, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. यासाठी २८ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. डब्ल्यूपीएलच्या एका संघात जास्तीत जास्त १८ खेळाडू असू शकतात आणि त्यापैकी सहा परदेशी खेळाडू असण्याची मर्यादा आहे. आगामी हंगामासाठी प्रत्येक संघाची वेतन मर्यादा १५ कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे लिलावापूर्वी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले जाते आणि कोणाला मुक्त केले जाते, यावर संघांची पुढील रणनीती अवलंबून असेल.
 
आगामी हंगामातील सामन्यांच्या आयोजनाबाबतही चित्र स्पष्ट होत असून मुंबई आणि वडोदरा ही प्रमुख ठिकाणे असण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामाप्रमाणे मुंबईतील सीसीआय आणि वडोदरातील कोटंबी स्टेडियमवर सामने होण्याची शक्यता आहे. वाराणसीमध्येही सामने आयोजित करण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र तेथील नव्या स्टेडियमची तयारी पूर्ण असणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत वाराणसीमध्ये सामने होण्याची शक्यता कमी आहे. डब्ल्यूपीएलचा पुढील हंगाम जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान होण्याची शक्यता असून, सध्याचे विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आहेत.