मालेगाव,
Ganeshotsav गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात भयमुक्त व शांततामय वातावरण कायम राहावे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने गुरुवारी मालेगाव पोलिसांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरुन पथसंचलनाद्वारे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे व अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या पथसंचलनाच्या माध्यमातून शहरातील संवेदनशील व मिश्र वस्तीच्या भागात पोलिसांची उपस्थिती दाखवून देण्यात आली. सकाळी ११.१० ते ११.५० वाजेपर्यंत पथसंचलन करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुक व शोभायात्रांच्या प्रमुख मार्गांचा यामध्ये समावेश करण्यात आला. हनुमान मंदिर, दुर्गा चौक, कुटे वेटाळ, महात्मा फुले चौक, माळी वेटाळ, खवले वेटाळ, पांडे वेटाळ, नगीना मस्जिद, जिल्हा परिषद शाळा चौक, शिव चौक व गांधी चौक यासह विविध संवेदनशील भागातून पोलिसांनी संचलन केले. जुन्या बसस्थानक परिसरात रूट मार्चचा समारोप करण्यात आला.
यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश देत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. या पथसंचलनामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार, मालेगावचे ठाणेदार राजेश खेरडे यांच्यासह ६ पोलिस अधिकारी, ४४ पोलिस कर्मचारी, २८ आरसीपी जवान आणि २८ होमगार्ड जवान सहभागी झाले होते.