नवी दिल्ली
semicon india 2026 राजधानीतील यशोभूमी येथे आयोजित ‘सेमीकॉन इंडिया २०२६’ या तीनदिवसीय जागतिक परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन झाले. १७ ते १९ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात ५२ देशांतील ६००हून अधिक कंपन्या आणि स्टार्टअप सहभागी होत आहेत. हजारो अभ्यागतांसह ४००हून अधिक वरिष्ठ अधिकारी आणि वक्ते या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यंदाच्या परिषदेची संकल्पना ‘Silicon to Systems: Building the Ecosystem’ अशी असून, भारतात सेमीकंडक्टरचे सर्वंकष परिसंस्था उभारण्यावर त्यात भर देण्यात आला आहे.
भारताच्या ‘इंडिया सेमीकंडक्टर मिशन २.०’च्या दृष्टीनेही या परिषदेचे विशेष महत्त्व आहे. चिप निर्मितीपासून त्यासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा साखळीपर्यंत देशांतर्गत क्षमता विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. जागतिक पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने यासाठी केंद्र सरकारने यंदा १.२५ लाख कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. सेमीकॉन इंडिया २०२६मध्ये जगभरातील कंपन्या आणि स्टार्टअपकडून सेमीकंडक्टरच्या संपूर्ण मूल्यसाखळीचे सादरीकरण करण्यात येत आहे. सेमीकंडक्टरसाठी लागणारे साहित्य, चिप डिझाइन, फॅब्रिकेशनपासून ते अत्याधुनिक पॅकेजिंगपर्यंतच्या प्रक्रियेची माहिती या माध्यमातून दिली जात आहे.
भारतासह जगभरातील उद्योगसंस्था, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, संशोधक आणि स्टार्टअप या परिषदेत सहभागी झाले आहेत. देशातील ६५०हून अधिक शैक्षणिक संस्थांमधील हजारो विद्यार्थीही या कार्यक्रमात आभासी पद्धतीने सहभागी झाले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा आज ७६वा वाढदिवस असल्याने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेमीकॉन इंडियाच्या व्यासपीठावरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सेमीकंडक्टर क्षेत्रातील पुढील टप्प्याच्या विकासासाठी ‘सेमीकॉन २.०’ची रचना सहा प्रमुख आधारस्तंभांवर करण्यात आल्याचे वैष्णव यांनी आपल्या भाषणात सांगितले. चिप, यंत्रसामग्री, डिस्प्ले व मेमरी घटक, अत्याधुनिक पॅकेजिंग युनिट, संशोधन व विकास तसेच कुशल मनुष्यबळ हे या सहा स्तंभांचे स्वरूप आहे. या सर्व घटकांच्या समन्वयातून देशातील संपूर्ण सेमीकंडक्टर परिसंस्था उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
सरकारने ओडिशामध्ये अत्याधुनिक 3D पॅकेजिंगची सुरुवात केली असून, सेमीकॉन इंडिया २०२६दरम्यान भारतात ५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणाही करण्यात आली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर सेमीकंडक्टर उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतात एक लाख प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हे कुशल मनुष्यबळ जागतिक सेमीकंडक्टर उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
सेमीकॉन इंडिया २०२६च्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी सूरतमधील सूची सेमीकॉन आणि पंजाबमधील सीडीआयएल या दोन नव्या व्यावसायिक चिप उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन केले. इलेक्ट्रिक वाहनांसह विविध उपकरणांसाठी आवश्यक असलेल्या चिप्सचे उत्पादन या युनिट्समध्ये केले जाणार आहे. या दोन प्रकल्पांच्या उद्घाटनानंतर भारतातील व्यावसायिक चिप उत्पादन कंपन्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. केंद्राच्या सेमीकंडक्टर मिशनमुळे भारत जागतिक सेमीकंडक्टर केंद्र बनण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे सरकारकडून नमूद करण्यात आले.
उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा देत भारतीय संस्कृतीतील विश्वकर्म्याचे सृजन आणि निर्माणाशी असलेले नाते अधोरेखित केले. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १५ दिवसांत घडलेल्या विविध घटनांनी भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेला नवी गती दिल्याचा दावाही त्यांनी केला. दहा दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या ग्लोबल फेस्टमध्ये एजंटिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानावर चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतातील ३,००० किलोमीटर लांबीचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पूर्णपणे कार्यान्वित झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
भारताची अर्थव्यवस्था विस्तारत असताना जगाचा भारतावरील विश्वासही वाढत असल्याचे मोदी यांनी म्हटले. तीन दिवसांपूर्वीच ब्रिक्स परिषद संपली असून, त्यात नवी दिल्ली घोषणापत्रावर स्वाक्षऱ्या झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. सेमीकॉन इंडिया परिषदेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचाही त्यांनी आढावा घेतला. २०२१मध्ये या परिषदेची सुरुवात झाली. पहिल्या आवृत्तीत धोरणांवर चर्चा झाली; त्यानंतरच्या टप्प्यात प्रकल्प, करारांवरील स्वाक्षऱ्या आणि पायाभरणीपर्यंतची प्रक्रिया पुढे गेली. गेल्या वर्षी पायलट प्रकल्प आणि नमुना उत्पादनांवर भर होता, तर यंदा भारताचे लक्ष व्यावसायिक चिप उत्पादनाकडे वळले असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
गुजरातमधील सूरत येथील सूची सेमीकॉन आणि पंजाबमधील मोहाली येथील सीडीआयएल या दोन्ही चिप उत्पादन युनिट्सचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्था मजबूत करण्यासाठी योगदान देणाऱ्या उद्योग क्षेत्रातील नेत्यांसह सर्व संबंधित घटकांचेही त्यांनी कौतुक केले.