कोलकाता,
3 thousand in women's accounts पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम बंगालमधील महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा केले. यावेळी बोलताना महिलांकडून मिळणारे प्रेम आणि विश्वास हीच आपली मोठी ताकद असल्याचे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमधील माता-भगिनींकडून नेहमीच मोठे प्रेम मिळत असल्याचे नमूद केले. याच दिवशी विश्वकर्मा पूजा असल्याने त्यांनी नागरिकांना शुभेच्छाही दिल्या. बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ देण्याची नवी परंपरा मजबूत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कुटुंबातील अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना छोट्या-मोठ्या निर्णयांसह घरखर्चाचीही काळजी घ्यावी लागते. आवश्यक खर्चाची चिंता काही प्रमाणात कमी झाल्यास महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि अन्नपूर्णा योजना त्यासाठी महत्त्वाची ठरत असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.यावेळी पंतप्रधानांनी ४ मे रोजी बंगालने बदलाचा नवा मार्ग स्वीकारल्याचा उल्लेख केला. या बदलामध्ये राज्यातील माता-भगिनींची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षांपासून महिलांनी विविध अडचणींचा सामना केला असून, त्यांच्या जीवनातील अडचणी कमी करणे आणि जीवनमान अधिक सुलभ करणे हे नव्या सरकारचे पहिले प्राधान्य असल्याचे मोदी यांनी म्हटले.
अन्नपूर्णा योजना याच उद्देशाने सुरू करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच या योजनेवर काम सुरू करण्यात आले आणि आता मोठ्या संख्येने महिलांच्या बँक खात्यांमध्ये थेट रक्कम जमा केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रक्रियेत कोणताही ‘कट-मनी’ किंवा मध्यस्थ नसल्याचे सांगत, पात्र असलेली एकही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.